spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मनपातर्फे शहरात 5 सीएनजी पंप सुरू करणार

– मनपाच्या बस डेपोंच्या विकासासाठी 13 कोटी 84 लाख रुपये मंजूर

– मनपाच्या परिवहन समितीच्या बैठकीत निधीला मंजुरी प्रदान

नागपूर :- मनपाच्या परिवहन विभागाच्या अखत्यारितील वाठोडा, खापरी, वाडी, हिंगणा व कारखाना विभागातील जागांवर बीओटी (बांधा-वापरा-हस्तांतरीत करा) या तत्वावर 5 सीएनजी पंप सुविधा विकसित करण्याचा प्रस्तावाला आज मंजुरी देण्यात आली. त्याचप्रमाणे नागपूर महानगरपालिकेच्या मोरभवनसह शहरातील तसेच शहराच्या बाहेर असलेल्या बस डेपोमध्ये पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी 13 कोटी 84 लाख 17 हजार 967 रुपयांच्या प्रशासनाच्या प्रस्तावाला मनपाच्या परिवहन समितीने आज मंजुरी प्रदान केली.

परिवहन समितीच्या सभापती मंगला खेकरे यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन समितीची बैठक डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात (ता. 3) पार पडली. यावेळी समितीचे उपसभापती सुधीर(बंडू) राऊत, सदस्य विजय होले, शकील पटेल, पूजा पाठक,  प्रमिला मथरानी, अर्चना पडोळे, मंगला मस्के, अतिरिक्त आयुक्त तथा परिवहन व्यवस्थापक मिलिंद मेश्राम, कार्यकारी अभियंता अल्पना पाटणे, प्रशासकीय अधिकारी योगेश लुंगे, व्यवस्थापक राजीव घाटाळे उपस्थित होते.

शहरातील बस वाहतुकीची वाढती आवश्यकता, प्रवाशांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे तसेच बसेसची पार्किंग, देखभाल व संचालन अधिक कार्यक्षमतेने करण्यासाठी मनपाच्या बस डेपोमध्ये पायाभूत सुविधा विकसित करण्याची आवश्यकता असल्याचे सभापती मंगला खेकरे यांनी मत मांडले. यात नवीन हिंगणा बस डेपो, खापरी बस डेपो, मोरभवन बस डेपो, जुना हिंगणा बस डेपो, व कोराडी बस डेपोमध्ये पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येणार आहे. या सर्व पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी 13 कोटी 84 लाख 17 हजार 967 रुपयांची आवश्यकता आहे. या विकासकामामुळे बसेसची पार्किंग, देखभाल व संचालन करणे अधिक कार्यक्षमतेने होण्यास मदत होणार आहे.

मोरभवन मध्ये काँक्रीटीकरण होणार

मोरभवन बस डेपो हा शहराच्या मध्यवर्ती असून या ठिकाणी सर्व ठिकाणी जाणार्या बसेस उपलब्ध राहतात. परंतु तेथील जागा समतल करण्याची आवश्यकता आहे. प्रवाशांना धुळीचा त्रास होत असल्याने मोरभवनचे समतल करून काँक्रीटकरण करण्यात यावे, अशी सूचना उपसभापती श्री. बंडू राऊत यांनी मांडली. या सूचनेला सर्व सदस्यांनी मान्यता दिली.

5 ठिकाणी सीएनजी पंप

मनपाच्या परिवहन विभागाच्या अखत्यारितील वाठोडा, खापरी, वाडी, हिंगणा व कारखाना विभागातील जागांवर बीओटी (बांधा-वापरा-हस्तांतरीत करा) या तत्वावर सीएनजी पंप सुविधा विकसित करण्याचा प्रस्तावाला आज मंजुरी देण्यात आली. यात सामान्य सीएनजी वाहनधारकांना सुद्धा सीएनजी भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. यासाठी निविदा काढण्याचे ठरविण्यात आले.

मिनी बस भाडेतत्वावर

आपली बस वाहतूक सेवेअंतर्गत प्रासंगिक करारावर बससेवा उपलब्ध करून देण्यासाठी वाहन प्रकार व आसनक्षमतेनुसार सुधारित दर निश्चित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यात मिनी डिझेल 25 आसनी बस 8 हजार रुपयांत दिवसभरासाठी करारावर देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्याचप्रमाणे मिडी ई-बस, स्टँडर्ड ईका ई-बस सुद्धा दिवसभरासाठी भाडेकरारावर देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

नागपूर सेफ अँड स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत बस निवारे व इतर ठिकाणी 65 किऑस्क लावण्यात आले आहेत. ते सर्व किऑक्स परिवहन विभागाकडे हस्तांतरीत करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यासंदर्भात परिवहन विभागाकडून तपासणी करून हस्तांतरीत करण्याचे ठरविण्यात आले. बसच्या प्रकारानुसार सुधारित प्रासंगिक करार दर निश्चित करण्यात आले असून समूहाला १० बसेस बुक केल्यास २० टक्के सवलत देण्यात आलेली असून सुचनेसह ठराव मंजुर करण्यात आला.

अतिरिक्त डेपो:

वाढीव बसेसच्या संचालनासाठी वाठोडा – 2 व खापरी -2 हे अतिरिक्त डेपो तयार निर्माण करण्यास आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामुळे शहरात डेपोची संख्या 8 झाली आहे.

शिल्लक रक्कम व लेखाजोखा:

जून ते सप्टेंबर २०२६ या कालावधीचा लेखाजोखा तपासणी सप्टेंबर अखेर रू. ८,२०,३८,६६५ रुपये शिल्लक रकमेसह आणि इतर महापालिकांच्या तुलनेत कमी खर्च असल्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

अर्थसंकल्प प्रावधान:

आर्थिक वर्ष २०२६-२७ करीता परिवहन विभाग बस संचालनाकरिता रु. १०८.५१ कोटी निधी मिळण्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला असून बससंख्या 430 वाढून ८२५ वर पोहोचली आहे.

Popular Articles