नागपूर :- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घरोघरी करण्यात येणाऱ्या स्वच्छतेतून निघणाऱ्या जुन्या, निरुपयोगी व वापरात नसलेल्या वस्तूंची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावून त्यांचा पुनर्वापर व पुनर्चक्रण करण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेतर्फे यंदाही ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत नागपूर शहरातील दहाही झोनमध्ये एकूण ४७ विशेष संकलन केंद्रे (दिवाळी वेस्ट डोनेशन सेंटर्स) उभारण्यात आले असून, नागरिकांसाठी ही विशेष व्यवस्था ६ नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध राहणार आहे.
या अभियानाचा शुभारंभ मंगळवारी(ता.०३) महापौर निता ठाकरे यांच्या हस्ते सिव्हील लाईन्स स्थित महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील विशेष संकलन केंद्राचे उद्घाटन करून करण्यात आला. यावेळी मनपा आयुक्त डॉ. विपिन, वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती मनिषा अतकरे, उपायुक्त राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी गजेंद्र महल्ले, यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी महापौरांनी वापरात नसलेल्या वस्तूंना मनपा मुख्यालयातील संकलन केंद्रात जमा करत शहरातील नागरिकांना सुद्धा वस्तू रस्त्यांवर, मोकळ्या जागेत त्यांचे योग्य संकलन व व्यवस्थापन व्हावे, यासाठी संकलन केंद्रांचा वापर करण्याचा कृतीतून संदेश दिला. याशिवय मनपाच्या झोन सभापतींनी झोननिहाय संकलन केंद्रांचे उदघाटन केले.
या विशेष संकलन केंद्रांवर नागरिकांना घरातील वापरात नसलेल्या व टाकाऊ वस्तू जमा करता येणार आहेत. यामध्ये जुने कपडे, पुस्तके, खेळणी, पुनर्वापरयोग्य वस्तू, घरगुती वापरातील निरुपयोगी साहित्य तसेच इतर टाकाऊ वस्तूंचा समावेश असेल. संकलित वस्तूंचे योग्य वर्गीकरण करून पुनर्वापरयोग्य वस्तूंचा पुनर्वापर, पुनर्चक्रणयोग्य साहित्याचे पुनर्चक्रण तसेच उर्वरित कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यावर भर देण्यात येणार आहे.
नागपूर महानगरपालिकेच्या या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून घरातील वापरात नसलेल्या वस्तू रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी न टाकता जवळच्या विशेष संकलन केंद्रावर जमा कराव्यात. वस्तूंचा पुनर्वापर, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाच्या माध्यमातून स्वच्छ व सुंदर नागपूर घडविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.








