spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भातपड क्षेत्रावर मोहरी लागवडीतून अतिरिक्त उत्पन्नाची संधी साधा — जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

– जिल्ह्यात २,५०० हेक्टरवर मोहरी लागवडीचे उद्दिष्ट; पीक विविधीकरणासाठी कृषी विभाग व आत्माचा पुढाकार 

गडचिरोली :- खरीप हंगामातील भात काढणीनंतर पडीक राहणाऱ्या जमिनीचा रब्बी हंगामात उपयोग करून मोहरीसारख्या पर्यायी पिकांच्या लागवडीला चालना देणे आणि पीक विविधीकरणातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, या अनुषंगाने जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्हास्तरीय कार्यशाळेत मार्गदर्शन केले. जिल्ह्यात यंदा २,५०० हेक्टर भातपड क्षेत्रावर रब्बी मोहरी लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ मधील नाविन्यपूर्ण बाबींअंतर्गत पीक विविधीकरण कार्यक्रमातून भातपड क्षेत्रावर रब्बी मोहरी लागवडीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ३ नोव्हेंबर रोजी समाजकल्याण भवन, गडचिरोली येथे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली एकदिवसीय कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेत मोहरी लागवडीचा विस्तार, सुधारित उत्पादन तंत्रज्ञान, निविष्ठांचे नियोजन, पीक व्यवस्थापन, शेतमालाचे विपणन आणि मूल्यवर्धन या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात प्रामुख्याने भाताची लागवड केली जाते. भात काढणीनंतर मोठ्या प्रमाणावर जमीन पडीक राहते. या क्षेत्रावर रब्बी हंगामात मोहरीसारख्या कमी कालावधीच्या पर्यायी पिकांची लागवड केल्यास जमिनीचा अधिक कार्यक्षम वापर होण्याबरोबरच शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाची संधी उपलब्ध होऊ शकते. या उद्देशाने जिल्ह्यात मोहरी लागवडीचा विस्तार करण्यासाठी कृषी विभाग व आत्माने पुढाकार घेतला आहे.

कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी मोहरी लागवडीविषयी माहिती देणाऱ्या घडीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. आत्माच्या प्रकल्प संचालक तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेचा उद्देश आणि पीक विविधीकरण कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली.

कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. किशोर झाडे यांनी मोहरी पीक लागवड व व्यवस्थापन, कीड आणि रोग नियंत्रण तसेच मधुमक्षिकापालन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी आनंद कांबळे यांनी मोहरी पिकाच्या मूल्यवर्धनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.

कार्यशाळेत शेतकऱ्यांमध्ये मोहरी लागवडीबाबत जनजागृती करणे, प्रत्यक्ष क्षेत्रावर पीक प्रात्यक्षिके राबविणे, लागवड क्षेत्र वाढविणे आणि उत्पादित शेतमालाच्या विक्रीसाठी योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे याबाबत नियोजन करण्यात आले. निश्चित केलेले लागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी आणि शेतकऱ्यांच्या सहभागातून कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यशाळेला जिल्ह्यातील उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक व समूह सहाय्यक उपस्थित होते. तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक, कृषी सखी, कृषी ताई, प्रगतिशील शेतकरी आणि महिला शेतकरी सहभागी झाले.

भात काढणीनंतर जमीन पडीक न ठेवता रब्बी हंगामात मोहरीसारख्या पर्यायी पिकांची लागवड करावी. पीक विविधीकरणाचा स्वीकार करून शेतीतून अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कृषी विभाग व आत्मा, गडचिरोली यांच्या वतीने करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वडसा येथील तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विनोद रहांगडाले यांनी केले, तर मुलचेरा येथील तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आकाश लवटे यांनी आभार मानले. आयोजनासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, आत्मा, स्मार्ट प्रकल्प व नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Popular Articles