spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गरिबांची दिवाळी ‘आनंदाच्या शिधा ‘विनाच?

🔸दुष्काळाच्या झळा, महागाईचा चटका 

🔸रामटेक तालुक्यातील ३२ हजारांहुन अधिक लाभार्थी प्रतीक्षेत 

सचिन चौरसिया, रामटेक :- तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेती संकटात, धानपिकांचे नुकसान आणि दुसरीकडे वाढत्या महागाईचा चटका अशा दुहेरी संकटात सापडलेल्या गरीब व गरजू कुटुंबांसमोर यंदा दिवाळी साजरी करण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. दिवाळीचा सण तोंडावर आला असतानाही शासनाच्या ‘आनंदाचा शिधा’ योजनेबाबत कोणताही दिलासा मिळत नसल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. रामटेक तालुक्यातील आनंदाचा शिधा या योजनेत पाञ ३२७२५ लाभार्थी असुन अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह शेती, शेतमजुरी आणि रोजंदारीवर अवलंबून आहे. यंदा पाण्याच्या समस्येमुळे धानपिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतीवर अवलंबून असलेल्या शेतमजुरांच्या रोजगारावरही त्याचा परिणाम होण्याची भीती आहे. घरखर्च, किराणा, कपडे आणि दिवाळीच्या इतर गरजा भागविताना सर्वसामान्यांची दमछाक होत आहे. दिवाळी म्हटली की घराघरात फराळ, गोडधोड आणि आनंदाचे वातावरण असते. मात्र, आर्थिक अडचणींमुळे अनेक कुटुंबांना सणाचा खर्च भागविणे कठीण झाले आहे. शासनाचा ‘आनंदाचा शिधा’ गरजू कुटुंबांसाठी मोठा आधार ठरू शकतो. या योजनेमुळे घरखर्चाचा भार काही प्रमाणात हलका होऊन गरीब कुटुंबांनाही दिवाळीचा सण आनंदाने साजरा करता येईल.

घोषणांपेक्षा प्रत्यक्ष मदतीची प्रतीक्षा !

दिवाळी अगदी जवळ आली असताना योजनेबाबत निर्णय होण्याची अपेक्षा लाभार्थी व्यक्त करीत आहेत. सणाच्या तोंडावर आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत. ‘आनंदाचा शिधा’ योजना पुन्हा सुरू करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्याचा लाभ पोहोचवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दुष्काळात तरी गोडवा द्या !

धानपिकांचे नुकसान, रोजगाराची अनिश्चितता आणि महागाईमुळे गरीब कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अशा परिस्थितीत ‘आनंदाचा शिधा’ योजना पुन्हा सुरू करणे गरजूंसाठी दिलासादायक ठरू शकते. दिवाळीच्या उंबरठ्यावर असलेल्या कुटुंबांना आश्वासन नव्हे, तर प्रत्यक्ष मदतीची गरज आहे. शासनाने तातडीने निर्णय घेऊन पात्र लाभार्थ्यांच्या घरात दिवाळीचा आनंद पोहोचवावा, हीच अपेक्षा !

आनंदाचा शिधा दिवाळीला वाटप करण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारचे आदेश आले नाही. त्यामुळे नियोजन करण्यात आले नाही. आदेश आल्यानंतर योग्य नियोजन करीत पात्र कार्डधारकांना लाभ देण्यात येईल.

संदेश हलमारे, तालूका पुरवठा निरिक्षण अधिकारी, रामटेक

Popular Articles