– १ ते ३० नोव्हेंबरदरम्यान राष्ट्रव्यापी मोहीम; कोषागार कार्यालयात फेऱ्या मारण्यापासून ज्येष्ठ नागरिकांची मुक्ती
हंसराज,भंडारा :- राज्य आणि केंद्र शासनाच्या निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी दिलासादायक बातमी आहे. निवृत्तीवेतन नियमित सुरू राहण्यासाठी दरवर्षी आवश्यक असणारा ‘हयातीचा दाखला’ (जीवन प्रमाणपत्र) आता ज्येष्ठ नागरिकांना थेट घरबसल्या सादर करता येणार आहे. केंद्र शासनाच्या निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागामार्फत १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत पाचवी राष्ट्रव्यापी ‘डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम’ राबविण्यात येत आहे.
या मोहिमेचा लाभ घेत सर्व निवृत्तीवेतनधारकांनी ‘जीवन प्रमाण’ या प्रणालीद्वारे आपले डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी सचिन मिलमिले आणि अपर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन) नितीन दानव यांनी केले आहे.
बँक किंवा कार्यालयात जाण्याची गरज नाही
राज्य शासनाच्या नियमांनुसार निवृत्तीवेतनाचे नियमित प्रदान सुरू राहण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात हयातीचा दाखला सादर करणे अनिवार्य असते. यापूर्वी यासाठी वयोवृद्ध नागरिकांना प्रत्यक्ष बँक शाखा किंवा कोषागार कार्यालयात जाऊन रांगेत उभे राहावे लागत असे. मात्र, ही प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी केंद्र शासनाने ‘जीवन प्रमाण’ ही डिजिटल प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष उपस्थित न राहता घरबसल्या दाखला सादर करणे शक्य झाले आहे.
मोबाईलवरून ‘फेस ऑथेंटिकेशन’ची सुविधा
या डिजिटल सुविधेचा वापर करण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांना आधार आधारित बायोमेट्रिक प्रमाणीकरण किंवा मोबाईल कॅमेऱ्याद्वारे ‘फेस ऑथेंटिकेशन’ (चेहरा प्रमाणीकरण) करता येते. अत्यंत सोप्या पद्धतीने मोबाईलवर काही मिनिटांत डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करून ते प्रणालीवर जमा होते. यामुळे ज्येष्ठ नागरिकांची धावपळ थांबणार आहे.
बँकांमध्येही आवश्यक सूचना
डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करण्याची अचूक प्रक्रिया आणि आवश्यक तांत्रिक माहिती सर्व संबंधित बँकांच्या शाखा अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. तसेच नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून प्रसारमाध्यमांद्वारेही माहिती पोहोचवली जात आहे.
प्रशासनाचे आवाहन :
“१ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत सर्व राज्य शासन निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी ‘जीवन प्रमाण’ प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करावा आणि वेळेत आपले डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करून सहकार्य करावे.”
— जिल्हा कोषागार विभाग








