– आगीच्या वाढत्या घटनांमुळे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा तडकाफडकी निर्णय
नागपूर :- नागपुरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 24 तासात 42 आगीच्या घटना घडल्यानंतर मनपाच्या शहरी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (यूडीएमए) शहरात हवेत उडणारे फटाके, स्काय शॉट, रॉकेट, व तत्सम फटाके इमारतीच्या गच्चीवर, टेरेस, बाल्कनी, झोपडपट्टी, बाजारपेठा, गर्दीचे ठिकाणी, वाहनतळ तसेच तत्सम ठिकाणी फोडण्यास आजपासून (ता. 9 नोव्हेंबर) 30 नोव्हेंबर पर्यंत पूर्णतः निर्बंध घातले आहे. यासंदर्भात यूडीएमएचे अध्यक्ष तथा आयुक्त डॉ. विपीन यांनी आदेश जारी केला आहे.
नागपूर शहरात रविवारी शहरात अवघ्या 24 तासात 42 पेक्षा अधिक आगीच्या घटना घडल्या. यात मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक मालमत्तेची हानी झाली. या आगीसाठी आकाशात उडणारे रॉकेट, स्काय शॉटमधून निघणार्ये ठिणग्यांमधून निघणार्या ज्वलनशील पदार्थ कारणीभूत ठरल्याचे निदर्शनास आले आहे. हे फटाके इमारतींच्या छतावर, गच्चीवर, झोपडपट्टीवर, भंगारची दुकाने, गोदाम, पेट्रोल पंप, वाहनांवर पडल्यास मोठी आग लागून मोठ्या प्रमाणावर जिवीतहानी व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या ठिकाणांवर घातले निर्बंध
ही शक्यता लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 (सुधारणा) अंतर्गत व मुख्य अग्निशमन अधिकार्यांकडून मिळालेल्या अहवालानुसार या काळात आगीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. नागपूर शहराची भौगोलिक रचना, गगनचुंबी इमारती, दाट लोकवस्ती, झोपडपट्ट्या, व्यावसायिक आस्थापने, गोदामे व ज्वलनशील पदार्थांची साठवणूक असलेली ठिकाणे विचारात घेऊन अशा प्रकारच्या फटाक्यांमुळे उद्भवणार्या घटनांमधून मनपाच्या अग्निशमन विभागापुढे मोठे आव्हान उभे राहू शकते. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन नागरी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (यूडीएमए) अध्यक्ष व आयुक्त डॉ. विपीन यांनी सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे, संभाव्य आगीच्या दुर्घटना टाळणे, सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात येत असल्याचे या आदेशात म्हटले. या आदेशानुसार मनपाच्या हद्दीतील इमारतीची गच्ची, टेरेस व बाल्कनी, रेफ्युजी एरिया, अरुंद रस्ते, ़झोपडपट्टी, दाटीवाटीचे रहिवाशी क्षेत्र, बाजारपेठा, वाहनतळ, या परिसरात फटाके, स्काय शॉट, रॉकेट़ उडविण्यास बंदी घातली आहे.
हे निर्बंध 9 नोव्हेंबरपासून 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत शहरात लागू राहणार आहे. या आदेशाचे नागपूर पोलीस आयुक्तालय, मनपाचा अग्निशमन विभागाने या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे या आदेशात म्हटले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्यांविरुद्धा नागपूर पोलिसांनी प्रचलित कायद्यानुसार कारवाई करावी, या आदेशाचे भंग करणार्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 ते 60 व भारतीय न्याय संहिता 2023 च्या कायद्यातील तरतुदीनुसार दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात नमूद आहे.






