– कनेक्टरची ६७ टक्के कामे पूर्ण
मुंबई :- मुंबई-नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूची थेट मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेला जोडणी देण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या चिर्ले ते एक्स्प्रेसवे कनेक्टरची ६७ टक्के स्थापत्य कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे पुढील वर्षात पूर्ण होण्याची शक्यता आहे. मार्ग लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) प्रयत्न आहे. या महत्त्वाकांक्षी कामामुळे मुंबई, नवी मुंबई आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गातील प्रवास अधिक वेगवान होणार आहे. कोकणातून येणाऱ्या वाहनांना विनाअडथळा मुंबईत येता येणार आहे.
अटल सेतूमुळे पुणे, कोकण भागातून येणाऱ्या वाहनांना थेट मुंबईत दाखल होणे शक्य झाले आहे. आता नव्या कनेक्टरमुळे अटल सेतूवरून मुंबईत पोहचणे अधिक सुलभ होणार असून पुण्यावरून येणाऱ्या वाहनांच्या प्रवास वेळेत ६० ते ९० मिनिटांची बचत होणार आहे. त्यासाठी चिर्ले ते मुंबई पुणे एक्स्प्रेसवे असा ७.३५ किमी लांबीचा आणि सहा मार्गिकांचा मार्ग उभारला जात आहे.
यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जाणेही सुलभ होणार आहे. तिसऱ्या मुंबईतील विकास केंद्रांनाही थेट जोडणी मिळणार असून त्यांना चालना मिळेल, अशी माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकल्पाचे काम फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट एमएमआरडीएने ठेवले आहे.
पनवेलचा वाहतूक अडथळा टाळता येणार
सध्या अटल सेतूवरून येणारी वाहने पनवेल मुख्य जंक्शन परिसरात मुंबई-पुणे आणि मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीला मिळतात. त्यामुळे गर्दीच्या वेळेत वाहनांच्या रांगा लागतात. नव्या जोडमार्गामुळे वाहनांना हा गर्दीचा जंक्शन टाळून थेट मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर प्रवेश करता येईल. परिणामी, वाहतुकीचा प्रवाह अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
७.३५ किमीचा सहापदरी मार्ग कमी कालावधीत सेवेत आणण्याचा ‘एमएमआरडीए’चा निर्धार
कामांची सद्य:स्थिती
चिर्ले विभाग पायाभरणीची कामे : १००%
स्तंभ उभारणी : ९८% – १५५ पैकी १५३ स्तंभ उभारले
डेक स्लॅबची कामे ४९% – २४० स्पॅनपैकी ११७ स्पॅन पूर्ण.
रेल्वे उड्डाणपूल : ८५%
पळस्पे विभाग
पाइल-ग्रुप फाउंडेशन ७१% – २१ पैकी १५ गटांचे काम पूर्ण
स्तंभ (पिलर्स) कास्टिंग ३८% – गर्डर कास्टिंग १००%
रेल्वे उड्डाणपूल – प्रत्यक्ष काम वेगाने प्रगतीपथावर
नवा मार्ग अटल सेतू आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग यांच्यातील दळणवळणाचा एक महत्त्वपूर्ण अपूर्ण दुवा पूर्ण करेल. त्यामुळे सध्याच्या जंक्शनवरील ताण कमी होण्यास मदत होईल. डॉ. संजय मुखर्जी, महानगर, आयुक्त, एमएमआरडीए.






