spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भीमा पाटस कारखान्याचे ऊस बिल अदा

– शेतकऱ्यांना प्रतिटन ३,५०० रुपये अदा

पाटस :- चालू गळीत हंगामात ऊसदराची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याने मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. ३१ ऑक्टोबर २०२६ अखेर गाळप झालेल्या उसासाठी प्रति मेट्रिक टन ३ हजार ५०० रुपयांप्रमाणे ऊस बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात सर्वप्रथम ऊस बिल अदा करण्याचा मान मिळवत भीमा पाटसने यंदाच्या हंगामात आघाडी घेतली आहे. कारखान्याच्या या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

एमआरएन भीमा शुगर अँड पॉवर प्रा. लि. संचलित भीमा सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात ८ ऑक्टोबरपासून गाळपाला सुरुवात केली आहे. अवघ्या ३१ दिवसांत, म्हणजे ७ नोव्हेंबरपर्यंत कारखान्याने २ लाख ७३ हजार १०१ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. या गाळपातून २ लाख ६३ हजार ५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेण्यात आले असून, सरासरी साखर उतारा ९.७१ टक्के नोंदविण्यात आला आहे. विशेष म्हणजे, कारखान्याचा दैनिक साखर उतारा १०.४७ टक्क्यांवर पोहोचला आहे. गाळपाच्या बाबतीतही भीमा पाटसने दमदार कामगिरी केली असून, पुणे जिल्ह्यात गाळपामध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे. गाळपातील सातत्य, साखर उताऱ्यातील सुधारणा आणि शेतकऱ्यांना वेळेत ऊस बिल अदा करण्याचे नियोजन यामुळे कारखान्याने हंगामाच्या सुरुवातीलाच आपली कार्यक्षमता दाखवून दिली आहे.

विशेष म्हणजे, १ नोव्हेंबरनंतर गाळपासाठी आलेल्या उसाचे पेमेंटही आठवड्याच्या अंतराने करण्याचे नियोजन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊस बिलासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. वेळेत पैसे मिळाल्याने रब्बी हंगामातील शेतीकामे, खते-बियाणे खरेदी आणि इतर आर्थिक गरजा भागविण्यास मदत होणार आहे. तसेच ऊस वाहतूक कंत्राटदार आणि तोडणी कामगारांनाही याचा सकारात्मक फायदा होणार आहे. निराणी उद्योग समूहाचे अध्यक्ष मुरुगेशजी निराणी, कार्यकारी संचालक संगमेशजी निराणी, विजय निराणी आणि डायरेक्टर ऑपरेशन्स विशाल निराणी यांच्या नियोजनबद्ध व्यवस्थापनामुळे कारखान्याने हंगामात चांगली कामगिरी केली आहे.

– शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

दौंडचे आमदार राहुल कुल यांचे मार्गदर्शन, तसेच कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांचे परिश्रम यामुळे ही कामगिरी शक्य झाल्याचे कारखाना प्रशासनाने म्हटले आहे. दरम्यान, कारखान्याने प्रतिटन ३ हजार ५०० रुपयांप्रमाणे ऊस बिल अदा केल्याने सभासद आणि ऊस उत्पादक – शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आगामी काळातही वेळेत पेमेंट करण्याची भूमिका व्यवस्थापनाने घेतली असून, शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या भीमा पाटस कारखान्याला जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी पाठवावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Popular Articles