बारामती :- दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर बारामती शहर पोलिसांनी औषधी इंजेक्शनच्या कथित अनधिकृत साठ्याविरोधात मोठी कारवाई केली. इंदापूर रोडवरील मार्केट यार्ड परिसरात छापा टाकून मेफेन्टरमाईन सल्फेट या औषधाच्या ११० इंजेक्शनच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
याआधी मे महिन्यात १०० इंजेक्शन प्रकरणी गुन्हा दाखल असलेला गौरव बाळासो जाधव या कारवाईत पुन्हा एकदा पुराव्यांसहित सापडला आहे. पोलिसांनी सनी गायकवाड, विशाल माने आणि प्रथमेश मोहरे यांच्यासह गौरव जाधव या चौघांना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून एकूण २ लाख ३१ हजार ७८४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईच्या वेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहाजवळच्या मैदानात एका खाद्यपदार्थांच्या टपरीमागे हे चार जण इंजेक्शनच्या बाटल्या घेऊन थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. छापा टाकला असता, त्यांच्याकडे इंजेक्शनच्या बाटल्या आढळल्या. यांच्याकडून आलेल्या ११० बाटल्यांपैकी गौरव जाधव, सनी गायकवाड आणि विशाल माने यांच्या प्रत्येकाकडे २५ बाटल्या तर प्रथमेश मोहरेकडे ३५ बाटल्या आढळून आल्या.
औषध विक्रीसाठी आवश्यक परवाना नसल्यामुळे पोलिसांनी या औषधींचा साठा जप्त केला. या घटनेचा अधिक तपास सुरू असून, औषधांचा मूळ पुरवठादार कोण आहे आणि या साठ्याचा वाहक कोण आहे याचा तपास चालू आहे. याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ५११/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






