spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कुंभमेळ्याच्या दर्शनपथासाठी रुग्णालय पाडले

– दुसरे रुग्णालयही तीन महिन्यांपासून बंद!

नाशिक :- त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या दर्शन पथासाठी उपजिल्हा रुग्णालयाची इमारत पाडण्यात आली. ही इमारत पाडण्याआधी उपजिल्हा रुग्णालय स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानच्या रुग्णालयात हलविण्यात आले. या स्थलांतराचा फटका प्रतिष्ठानला बसला असून त्यांना रुग्णालय बंद करुन सरकारी रुग्णालय सुरू करण्यात आले. विशेष म्हणजे, तीन महिन्यांहून अधिक कालावधी लोटला असला तरी आरोग्य विभागाकडून प्रतिष्ठानशी अद्याप भाडेकरार झालेला नाही.

जव्हार, मोखाडा या आदिवासीबहुल भागासह नाशिकमधून येणाऱ्या रुग्णांना आता अन्य ठिकाणी आरोग्य सेवा घ्यावी लागत असल्याने लवकरच हे रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालय दर्शनपथाच्या कामासाठी पाडण्यात आले. हे रुग्णालय स्वामी विकेानंद हॉस्पिटलमध्ये स्थलांतरीत झाले. या प्रक्रियेत शासनाने प्रतिष्ठानचे रुग्णालय पूर्णत: बंद करण्यास सांगितले. प्रतिष्ठानच्या रुग्णालयात सोनोग्राफी, शस्त्रक्रिया यासह वेगवेगळ्या सुविधा होत्या. जोखमीच्या तसेच गुंतागुंतीच्या काही शस्त्रक्रिया या ठिकाणी होत असत. सामाजिक दायित्वांमधून अनेक डॉक्टरांकडून या ठिकाणी रुग्णसेवा दिली जात होती.

स्थानिक तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या रुग्णांना नाममात्र शुल्क भरुन उपचार, जेवण अशी व्यवस्था मिळत होती. या ठिकाणी प्रसूती (शस्त्रक्रिया), डोळ्यांची शस्त्रक्रिया, अस्थिरोगाशी संबंधित उपचार होत होते. याविषयी रुग्णालयाचे विश्वस्थ स्वामी विश्वरूपानंद यांनी, सरकारी रुग्णालय स्थलांतरीत करताना प्रतिष्ठानचे रुग्णालय पूर्णत: बंद करण्यात आल्याचे सांगितले. आमच्या रुग्णालयात होणाऱ्या डोळ्यांच्या तसेच अन्य शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्या. याशिवाय बाह्यरुग्ण विभागही बंद आहे. रुग्णालयात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गावांसह जव्हार, मोखाडा येथूनही रुग्ण येत होते. मागील तीन महिन्यांपासून हे रुग्णालय बंद असून त्यांना अन्य ठिकाणी उपचार घ्यावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

रुग्णसंख्या घटली, भाडेकरार रखडला…

त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय प्रतिष्ठानच्या रुग्णालयात स्थलांतरीत झाल्यावर त्र्यंबकेश्वरमधील रुग्ण कमी झाले असले तरी अन्य रुग्ण नव्याने येत आहेत. या ठिकाणी प्रसूतीचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे, रुग्णालय स्थलांतर होऊन तीन महिने कालावधी लोटला असला तरी अद्याप प्रशासनाच्या वतीने भाडेकरार झालेला नसल्याचे विश्वारूपानंद यांनी सांगितले. अद्याप भाडे निश्चित झाले नसून आगामी कुंभमेळ्यात सर्व घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहचावी तसेच स्वामी विवेकानंद रुग्णालयाच्या रुग्णांसाठी लवकरात लवकर रुग्णालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी व्यवस्थापनांकडून करण्यात आली आहे. प्रशासनाकडून लवकरच भाडेकरार होईल, असे सांगण्यात आले असल्याचे स्वामी विश्वारुपानंद यांनी नमूद केले.

Popular Articles