– एकतर तिकीट ‘कन्फर्म’ होईल नाही तर ‘कॅन्सल’ होईल!
मुंबई :- रेल्वेचे ‘आरएसी तिकीट’ (रिझर्व्हेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन) मिळाल्यानंतरही झोपण्यासाठी जागा न मिळाल्याने प्रवाशांना होणारा त्रास आता संपण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाकडून अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही सुविधा बंद करण्याच्या प्रस्तावावर सध्या विचार सुरू आहे. संसदीय समितीच्या मंजुरीनंतर याची अंमलबजावणी होण्याची शक्यता असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे येत्या काळात प्रवाशांना ‘कन्फर्म’ आणि ‘कॅन्सल’ हे दोनच पर्याय उपलब्ध असणार आहेत.‘आरएसी’ व्यवस्थेत दोन प्रवाशांना एकाच ‘साइड लोअर बर्थ’वर जागा दिली जाते. त्यांच्याकडून पूर्ण तिकीटदर आकारला जातो. त्यामुळे अर्ध्या बर्थसाठी पूर्ण भाडे का, असा प्रश्न उपस्थित होत होता. संसदीय समितीनेही या व्यवस्थेचा फेरविचार करण्याची शिफारस केली. रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन सध्याच्या ‘आरएसी’ व्यवस्थेचा आढावा घेण्यात येत आहे.
आरक्षण उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता
ही सुविधा बंद करण्याचा निर्णय झाल्यास प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना बर्थ उपलब्ध करून देण्याच्या सध्याच्या व्यवस्थेत बदल होऊ शकतो. वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये ‘आरएसी’ची तरतूदच नाही. या ट्रेनमध्ये आगाऊ आरक्षण कालावधी सुरू होताच उपलब्ध सर्व बर्थ खुल्या केल्या जाणार आहेत. प्रत्येक प्रवाशाला स्वतंत्र बर्थ दिली जाईल. या ट्रेनमध्ये महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांसाठीच आरक्षण कोटा असेल.






