पांढरकवडा :- १७ वर्षांखालील मुलींच्या राज्यस्तरीय शालेय कबड्डी निवड चाचणीसाठी पांढरकवडा येथील जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या तीन खेळाडूंची अमरावती विभागातून निवड झाली आहे. खुशी संजय मडावी, अनुष्का सुनील जाधव आणि जान्हवी अरुण कन्नलवार अशी निवड झालेल्या खेळाडूंची नावे आहेत.
सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील संजय घोडावत आंतरराष्ट्रीय विद्यालयात १३ व १४ नोव्हेंबर रोजी ही राज्यस्तरीय निवड चाचणी पार पडणार आहे. १७ वर्षांखालील मुलींच्या शालेय कबड्डी स्पर्धेत जिल्हा परिषद हायस्कूलच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करीत विभागीय स्तरापर्यंत मजल मारली होती. त्यानंतर वाशिम येथील क्रीडा संकुलात पार पडलेल्या राज्यस्तरीय निवड प्रक्रियेत अमरावती विभागातील पाच खेळाडूंची निवड करण्यात आली. यामध्ये पांढरकवडा येथील एकाच विद्यालयातील तीन खेळाडूंनी स्थान मिळविल्याने तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.
विशेष म्हणजे, निवड झालेल्या तिन्ही खेळाडू मित्र क्रीडा मंडळाच्या राष्ट्रीय खेळाडू असून, त्यांनी यापूर्वी कबड्डी व खो-खो या खेळांच्या राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्या या यशामुळे पांढरकवड्याच्या क्रीडा क्षेत्राची मान उंचावली आहे.
खेळाडूंच्या या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक अंगिरस निबुडे, मित्र क्रीडा मंडळाचे अध्यक्ष मदन जिड्डेवार, सचिव तथा तालुका क्रीडा संयोजक सुनील कोपुलवार आणि विश्वस्त गणपत डोंगरे यांनी अभिनंदन केले. तसेच आगामी राज्यस्तरीय निवड चाचणीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंना मित्र क्रीडा मंडळाचे प्रशिक्षक रवि दर्शनवार यांचे मार्गदर्शन लाभले.






