– थाट्या समाजात तीव्र निरुत्साह
चिखलदरा :- दिवाळीपूर्वी महाराष्ट्र शासनाने दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करून काही प्रमाणात दिलासा दिला. मात्र, संपूर्ण आयुष्य रानावनात भटकंती करून जनावरे चारणाऱ्या गुराखी आणि पशुपालक समाजाला शासनाच्या या मदतीपासून पूर्णपणे वंचित राहावे लागले आहे. शासनाच्या या दुर्लक्षाचा थेट फटका मेळघाटातील प्रसिद्ध आणि पारंपरिक घुंगरू बाजाराला बसला असून, या बाजाराचा मुख्य केंद्रबिंदू असलेल्या थाट्या समाजात सध्या तीव्र निरुत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
पशुपालकांचे आर्थिक कंबरडे मोडले
मेळघाट परिसरात दरवर्षी दिवाळीनंतर पारंपरिक घुंगरू बाजाराची मोठी धूम असते. या बाजारात प्रामुख्याने पशुपालन करणारा थाट्या समाज मोठ्या संख्येने सहभागी होतो. आपल्या जनावरांच्या सजावटीसाठी घुंगरू, दोरखंड, माळा आणि इतर साहित्य खरेदी करण्यासाठी थाट्या बांधव वर्षभर या बाजाराची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र, यंदा निसर्गाचा लहरीपणा व दुष्काळी परिस्थितीमुळे पशुपालकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.
उलाढाल मंदावली
सध्या मेळघाटात घुंगरू बाजार भरला असला तरी दरवर्षीसारखा उत्साह आणि गर्दी यंदा दिसून येत नाही. चणचणीमुळे थाट्या समाजातील बांधवांनी खरेदीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
आम्हा गुराख्यांचा सरकारला विसर
शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी शासनाने मदत दिली. त्याचे स्वागतच आहे. पण, रात्रंदिवस जनावरांच्या मागे फिरणाऱ्या आम्हा गुराख्यांचा सरकारला विसर पडला आहे. हातात पैसा नसल्याने यंदा घुंगरू बाजारात खरेदी करण्याचा उत्साहच उरलेला नाही.
– सायबा कुमरे, स्थानिक गुराखी






