spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कार्तिक मासाच्या पावन पर्वावर देरडा येथे संगीतमय श्रीमद् भागवत कथा नामसंकीर्तन सप्ताहाचे आयोजन १५ ते २२ 

– १५ ते २२ नोव्हेंबरदरम्यान धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी; २२ नोव्हेंबर रोजी भव्य महाप्रसाद

देरडा :- कार्तिक मासाच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून समस्त देरडा ग्रामवासी मंडळी, देरडा (सावंगी) यांच्या सौजन्याने संगीतमय, हृदयस्पर्शी श्रीमद् भागवत कथा व नामसंकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, १५ नोव्हेंबरपासून या धार्मिक सप्ताहाला प्रारंभ होणार असून रविवार, २२ नोव्हेंबर रोजी महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता होणार आहे. या सप्ताहात भागवताचार्य वाणीभूषण ह.भ.प. भूषण महाराज सिंगरवाडे (शेंदुर्जना घाट, जि.अमरावती) यांच्या रसाळ वाणीतून श्रीमद् भागवत कथेचे निरूपण होणार आहे. तसेच देरडा येथील ह.भ.प. सचिन महाराज कोंबे यांच्या सानिध्यात हा धार्मिक सोहळा पार पडणार आहे. भागवत सप्ताहाच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमय लीलांचे वर्णन, संतविचार, आध्यात्मिक चिंतन आणि नामस्मरणाचा संदेश भाविकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. संगीताच्या सुरावटी, भजन, कीर्तन आणि हरिनामाच्या गजराने संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.

या सप्ताहासाठी वारकरी मंडळी तसेच भजन- कीर्तन क्षेत्रातील मान्यवरांचे सहकार्य लाभणार आहे. सप्ताहाच्या कालावधीत विविध महाराजांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ग्रामस्थांच्या सहकार्याने दररोजच्या पंगतींचे नियोजनही करण्यात आले आहे. रविवार, २२ नोव्हेंबर रोजी सप्ताहाचा समारोप होणार असून यानिमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्यात परिसरातील भाविक, वारकरी, महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन श्रीमद् भागवत कथेचा व नामसंकीर्तनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त देरडा ग्रामवासी मंडळींच्या वतीने करण्यात आले आहे. गावातील धार्मिक परंपरा जोपासण्या बरोबरच भक्ती, अध्यात्म, सामाजिक एकोपा आणि वारकरी संप्रदायाचे विचार रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित हा भागवत सप्ताह देरडा परिसरासाठी श्रद्धा आणि भक्तीचा विशेष सोहळा ठरणार आहे.

Popular Articles