– शंकरा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजन; १०० सदस्यांचा सहभाग
नागपूर :- महाराष्ट्र सेवानिवृत्त पोलिस अधिकारी कल्याणकारी असोसिएशन, नागपूरची सर्वसाधारण सभा रविवार, १५ नोव्हेंबर रोजी, धंतोली येथील शंकरा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अध्यक्ष रमेश मेहता यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. या सभेला असोसिएशनचे सुमारे १०० सदस्य उपस्थित होते. सभेनंतर हॉस्पिटलच्या सौजन्याने सदस्यांसाठी मोफत सर्वसाधारण आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. यामध्ये ईसीजी, रक्तदाब (बीपी), रक्तशर्करा आदी तपासण्या करून तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्यविषयक सल्ला देण्यात आला. यावेळी अस्थिरोग व सांधेरोग तज्ज्ञ डॉ. जितेंद्र रामलखन यादव, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अग्रवाल आणि जनरल सर्जन डॉ. इंगळे यांनी सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाढत्या वयात आरोग्याची काळजी, योग्य आहार, आजारांवरील उपचार आणि नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला अध्यक्ष रमेश मेहता, गुप्ता, रामलखन यादव, सुरेश महाले, नागेश घोडकी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वितेसाठी डॉ. जितेंद्र रामलखन यादव व त्यांच्या वैद्यकीय चमूने विशेष सहकार्य केले. तसेच असोसिएशनचे अध्यक्ष रमेश मेहता, कोषाध्यक्ष गुप्ता, सचिव सुरेश महाले, सहसचिव नागेश घोडकी, कार्यकारी सदस्य देवलकर, मोरेश्वर उपासे, आबाराव मेंढे, केवाराम हटवार आणि हॉस्पिटलचे लायझनिंग अधिकारी राजेश यादव यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. शंकरा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली माफक दरात विविध आरोग्य तपासण्या व उपचारविषयक सल्ला उपलब्ध असल्याची माहिती देत, सर्वांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष रमेश मेहता यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सचिव सुरेश महाले यांनी तर सहसचिव नागेश घोडकी यांनी आभार मानले. शेवटी हॉस्पिटल व रामलखन यादव यांच्या सौजन्याने आयोजित स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.






