spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खापा शहरात तीन दिवसीय भव्य मंडई उत्सवाचे आयोजन!

–  विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी; गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा होणार गौरव

खापा, वार्ताहर :- खापा शहरातील व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्या पुढाकारातून बुधवार, दि. १९ नोव्हेंबर ते शुक्रवार, दि. २१ नोव्हेंबरदरम्यान तीन दिवसीय मंडई उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाच्या माध्यमातून शहरात सांस्कृतिक आणि मनोरंजनाची विशेष पर्वणी अनुभवायला मिळणार आहे.

नवयुवक व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने बँक ऑफ बडोदा समोरील प्रांगणात, व्यापारी मित्र परिवाराच्या वतीने भवानी माता मंदिराजवळील प्रांगणात, तर संत पतिराम महाराज नाट्य मंडळाच्या वतीने माताखेडी येथील हनुमान मंदिराजवळील प्रांगणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवादरम्यान आकर्षक झुले, रंगीबेरंगी मनोरंजनाची खेळणी, लावणी नृत्य, रेकॉर्डिंग डान्स तसेच पारंपरिक तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे उत्सवात विशेष रंगत येणार आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी मनोरंजनाची विविध साधने उपलब्ध राहणार असल्याने परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी होण्याची अपेक्षा आहे.

विशेष म्हणजे, या उत्सवानिमित्त बँक ऑफ बडोदा समोरील प्रांगण येथे नवयुवक व्यापारी मित्र मंडळ तर्फे खापा शहरातील विविध शाळांमधून इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच लॅक्रॉस खेळातील खेळाडूंचा विशेष सत्कार करून त्यांच्या यशाचा गौरव करण्यात येणार आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासोबतच क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंच्या कामगिरीला प्रोत्साहन मिळणार आहे.

मंडई उत्सवाच्या निमित्ताने शहरात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण होणार असून, खापा शहरासह परिसरातील नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून तीन दिवसीय मंडई उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक मंडळांच्या वतीने करण्यात आले आहे.

Popular Articles