spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महाराष्ट्र महिला पत्रकार संमेलन २०२६ : महिला पत्रकारांच्या अनुभवांना व्यासपीठ देण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संमेलन

मुंबई :- पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महिलांच्या अनुभवांना आणि प्रश्नांना व्यासपीठ देण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या महिला विभागाच्या वतीने बुधवार, १८ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘महाराष्ट्र महिला पत्रकार संमेलन २०२६’ आयोजित करण्यात आले आहे. नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सांस्कृतिक सभागृहात सकाळी १० ते सायंकाळी ४.३० या वेळेत हे संमेलन होणार आहे.

पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना महिलांना अनेक वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागते. बदलत्या माध्यमविश्वात पत्रकारितेचे स्वरूप बदलत असताना महिलांचे योगदान, त्यांच्यासमोरील अडचणी, संपादकीय स्तरावरील नेतृत्व आणि स्वतंत्र पत्रकारितेची भूमिका यावर संवाद घडणे महत्त्वाचे आहे, याच उद्देशाने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या या संमेलनात महाराष्ट्रातील विविध माध्यमांमध्ये कार्यरत असलेल्या महिला पत्रकार, संपादक आणि माध्यम क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत.

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या प्रास्ताविकाने संमेलनाची सुरुवात होईल. उद्घाटन सत्रात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष निर्मला सामंत-प्रभावळकर, ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी, ‘क्वेश्वन ऑफ सिटीज’च्या संस्थापक संपादक स्मृती कोप्पिकर आणि एमजीएम विद्यापीठाच्या अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके सहभागी होतील. यावेळी ‘राजसत्तेतल्या कारभारणी’ या विशेषांकाचे प्रकाशनही होणार आहे.

दिवसभरात दूरचित्रवाणीवरील वृत्तनिवेदन, संपादकीय क्षेत्रातील महिला नेतृत्व, स्वतंत्र पत्रकारिता आणि दुष्काळाच्या वार्तांकनासारख्या विषयांवर चर्चा होणार आहे. विविध माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना आपले अनुभव मांडण्याची आणि एकमेकांशी संवाद साधण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. एमजीएम विद्यापीठाचे कॉलेज ऑफ कम्युनिकेशन, कल्चर अँड मीडिया, छत्रपती संभाजीनगर हे या संमेलनाचे ज्ञान भागीदार (नॉलेज पार्टनर) आहेत.

पत्रकारिता क्षेत्रातील महिला पत्रकार, माध्यम अभ्यासक, विद्यार्थी आणि इच्छुकांनी या संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन यशवंतराव चव्हाण सेंटरच्या महिला विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Popular Articles