spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राष्ट्रीय सोहळ्याच्या यशस्वी आयोजनातून गडचिरोलीच्या नियोजनक्षमतेचा प्रत्यय

– जनजातीय गौरव दिनाच्या ऐतिहासिक सोहळ्यासाठी मंत्री, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे समन्वयपूर्ण प्रयत्न

गडचिरोली :- भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त गडचिरोली येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित जनजातीय गौरव दिनाचा राष्ट्रीय सोहळा यशस्वीपणे पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे या सोहळ्याला संबोधित केले. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय आदिवासी कार्य मंत्री जुएल ओराम, केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री दुर्गादास उईके, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्र व राज्य शासनातील मंत्री, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. राष्ट्रीय स्तरावरील या भव्य आयोजनाच्या यशामागे शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी, विविध यंत्रणा आणि प्रसिद्धी माध्यमांचे समन्वयपूर्ण प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरले.

गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यात प्रथमच आयोजित या राष्ट्रीय सोहळ्याच्या यशस्वितेसाठी अनेक दिवसांपासून नियोजन आणि पूर्वतयारी सुरू होती. विविध विभागांमधील समन्वय, कार्यक्रमस्थळाची सज्जता, मान्यवरांच्या आगमनाची व्यवस्था, सुरक्षा, वाहतूक, निवास, भोजन, स्वच्छता आणि नागरिकांच्या सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात आले. प्रत्येक स्तरावरील जबाबदारी निश्चित करून नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली.

आदिवासी विकास मंत्र्यांचे आयोजनावर बारकाईने लक्ष

राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी या राष्ट्रीय सोहळ्याच्या तयारीसाठी गडचिरोलीत मुक्काम करून आयोजनाच्या विविध बाबींवर बारकाईने लक्ष ठेवले. कार्यक्रमस्थळांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांनी व्यवस्थांची पाहणी केली. संबंधित अधिकारी आणि यंत्रणांशी सातत्याने संवाद साधत आवश्यक सूचना दिल्या. कार्यक्रमाच्या नियोजनापासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला.

जिल्हाधिकाऱ्यांकडून सातत्यपूर्ण आढावा

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कार्यक्रमाच्या पूर्वतयारीत महत्त्वपूर्ण समन्वयाची भूमिका बजावली. त्यांनी नियमितपणे कार्यक्रमस्थळांना भेटी देऊन विविध व्यवस्थांची प्रत्यक्ष पाहणी केली. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. आढळणाऱ्या त्रुटी तातडीने दूर करण्याच्या सूचना देत सर्व यंत्रणांमध्ये समन्वय राखण्यावर त्यांनी भर दिला. कार्यक्रमाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रशासनाची सज्जता कायम राहावी, यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त निलेश सागर, सहसंचालक चंचल पाटील आणि सहआयुक्त जितेंद्र चौधरी यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी गडचिरोली येथे उपस्थित राहून आयोजनाच्या विविध बाबींवर लक्ष ठेवून होते. सांस्कृतिक कार्यक्रम, कलाकारांच्या सुविधा, मान्यवरांची व्यवस्था आणि विभागीय समन्वय याबाबत त्यांनी संबंधित यंत्रणांना मार्गदर्शन केले. जिल्हा प्रशासन आणि आदिवासी विकास विभागाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे कार्यक्रमाच्या नियोजनाला गती मिळाली.

लोकप्रतिनिधी आणि सहकाऱ्यांचा सक्रिय सहभाग

गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे व स्थानिक पदाधिकारी यांनीही या राष्ट्रीय सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सक्रिय सहभाग नोंदविला. त्यांचे सहकारी, विविध आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या तयारीपासून प्रत्यक्ष आयोजनापर्यंत विविध स्तरांवर सहकार्य केले. स्थानिक पातळीवरील व्यवस्थांमध्ये लक्ष घालून त्यांनी प्रशासनाला आवश्यक सहकार्य केले. लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्यातील समन्वयामुळे आयोजन अधिक प्रभावी होण्यास मदत झाली.

राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी देण्यात माध्यमांचे मोलाचे योगदान

या ऐतिहासिक सोहळ्याची माहिती राज्यासह देशभर पोहोचविण्यात प्रसिद्धी माध्यमांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. गडचिरोली जिल्ह्यातील वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी वाहिन्या, डिजिटल न्यूज पोर्टल्स, वृत्तसंस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार, स्ट्रिंगर्स, छायाचित्रकार आणि व्हिडिओ पत्रकार यांनी कार्यक्रमाच्या पूर्वतयारीपासून मुख्य सोहळ्यापर्यंत सातत्याने वार्तांकन केले.

कार्यक्रमातील महत्त्वपूर्ण घडामोडी, मान्यवरांची भाषणे, आदिवासी कला-संस्कृतीचे दर्शन आणि जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित संदेश विविध माध्यमांतून व्यापक स्तरावर पोहोचविण्यात आले. विशेषतः स्थानिक पत्रकार आणि स्ट्रिंगर्स यांनी वेळोवेळी बातम्या, छायाचित्रे व दृकश्राव्य सामग्री उपलब्ध करून दिल्यामुळे राष्ट्रीय स्तरावर या सोहळ्याला प्रसिद्धी मिळण्यास मदत झाली.

सामूहिक प्रयत्नांतून राष्ट्रीय आयोजन यशस्वी

या राष्ट्रीय सोहळ्याच्या यशस्वितेमध्ये पोलीस प्रशासन, महसूल विभाग, आदिवासी विकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, नगर परिषद, क्रीडा विभाग तसेच इतर शासकीय यंत्रणांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचेही महत्त्वपूर्ण योगदान राहिले. विविध जबाबदाऱ्या पार पाडणारे कर्मचारी, स्वयंसेवक, कलाकार आणि आयोजनाशी संबंधित सर्व घटकांनी आपापल्या स्तरावर परिश्रम घेतले.

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त झालेला हा राष्ट्रीय सोहळा केवळ एक शासकीय कार्यक्रम न ठरता आदिवासी अस्मिता, सांस्कृतिक वैभव आणि गडचिरोलीच्या बदलत्या ओळखीचे प्रभावी दर्शन घडविणारा ठरला. मान्यवरांच्या उपस्थितीतील राष्ट्रीय कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करून गडचिरोलीने आपली संघटनक्षमता आणि प्रशासकीय समन्वयाचे दर्शन घडविले.

मंत्री व लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियोजन, प्रशासनाचे परिश्रम, विविध यंत्रणांचे सहकार्य आणि प्रसिद्धी माध्यमांचा सक्रिय सहभाग या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून हा ऐतिहासिक राष्ट्रीय सोहळा यशस्वी झाला. गडचिरोलीच्या वाटचालीतील हा सोहळा सामूहिक प्रयत्न आणि प्रभावी समन्वयाचे स्मरणीय उदाहरण ठरला.

Popular Articles