– यवतमाळात मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन
– 20 नोव्हेंबरला नेत्रतपासणी, तर 21 व 22 नोव्हेंबरला शस्त्रक्रिया
यवतमाळ :- मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पुणे येथील नेत्रसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रोजेक्ट नयनतारा’ अंतर्गत जिल्ह्यात तिरळेपणामुक्त अभियान राबविण्यात येत असून या अंतर्गत यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथे बाह्यरुग्ण विभागात जिल्हास्तरीय मोफत तिरळेपणा तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रकल्पांतर्गत शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथे बाह्यरुग्ण विभागात (OPD) तिरळेपणा तपासणी शिबिर होणार आहे. तपासणीनंतर पात्र रुग्णांवर 21 व 22 नोव्हेंबर रोजी मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
या शिबिराचा लाभ लहान मुले, तरुण-तरुणी तसेच सर्व वयोगटांतील तिरळेपणाचा त्रास असलेल्या नागरिकांना घेता येणार आहे. विशेषतः 18 ते 25 वयोगटातील लग्न इच्छुक तरुण-तरुणी आणि विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
पुणे येथील नेत्रसेवा प्रतिष्ठानचे मुख्य नेत्रतज्ज्ञ व अध्यक्ष डॉ. मधुसूदन झंवर यांचा या शिबिरात सहभागी होणार आहेत. या प्रतिष्ठानने 40 वर्षांपासून अखंड नेत्रसेवा दिली असून, आतापर्यंत 250 निदान शिबिरे आणि 203 शस्त्रक्रिया शिबिरे आयोजित केली आहेत. प्रतिष्ठानच्या लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तीन वेळा नोंदी झाल्या असून, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही नोंद आहे.
तिरळेपणाची समस्या असलेल्या लहान मुले, तरुण आणि नागरिकांनी 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ओपीडीमध्ये उपस्थित राहून तपासणी करून घ्यावी. अधिक माहितीसाठी डॉ. प्रसाद बनसोड (9422169284), आनंद देशपांडे (9420201456) किंवा सुमित पारखे (8390023393) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तिरळेपणावर वेळीच उपचार घेऊन सुंदर दृष्टिचा आनंद मिळवावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.






