– मनपाच्या परिवहन समितीच्या बैठकीत 50 टक्के वाढीचा निर्णय
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या बस थांब्याची देखभाल, दुरुस्ती, स्वच्छता तसेच प्रकाश व्यवस्था पुरविण्यासाठी नियुक्त केलेल्या संस्थेकडून घ्यावयाच्या रॉयल्टी दरात 50 टक्के वाढ केल्याने मनपाच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. संबंधित संस्थेला पाच वर्षांची मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावाला परिवहन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन समितीची बैठक समितीच्या सभापती मंगला खेकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता. 17) डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समितीच्या सभागृहात पार पडली. यावेळी उपसभापती सुधीर राऊत, सदस्य रुपाली ठाकूर, विजय होले, दिनेश यादव, प्रमिला मथरानी, पूजा पाठक, अर्चना पडोळे, मंगला मस्के यांच्यासह अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम, परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी योगेश लुंगे, राजीव घाटोळे उपस्थित होते.
मे. साईनपोस्ट इंडीया लिमीटेड या संस्थेमार्फत बीओटी तत्वावर नागपूर शहरातील विविध ठिकाणी आधुनिक बसथांब्यांची उभारणी करण्यात आलेली आहे. या करारानुसार या संस्थेला सदर बसथांब्यावर जाहीरात प्रदर्शित करण्याचे हक्क दिले आहेत. या संस्थेसोबत असलेल्या कराराला पुन्हा पाच वर्षांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव बैठकीत चर्चेला आला. यात प्रशासनाने रॉयल्टी दरात 30 टक्क्यांनी वाढ करण्याची शिफारस केली होती. यावेळी समितीच्या सदस्यांनी रॉयल्टी दरात 50 टक्क्यांनी वाढ करण्याची सूचना केली. यासूचनेला समितीच्या सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली.
परिवहन विभागाचा अभ्यास दौरा
देशातील प्रमुख शहरातील परिवहन व्यवस्था कशी आहे, याचा अभ्यास करण्यासाठी परिवहन समितीच्या सदस्यांचा अभ्यास दौरा करण्यास बैठकीत मंजुरी देण्यात आली. चेन्नई, बेंगलुरू, दिल्ली व सूरत या शहरांपैकी कोणत्याही दोन शहरांतील परिवहन व्यवस्थेचा दोन गट अभ्यास दौरा करणार आहे. या अभ्यास दौर्यात बस ताफ्याचे प्रभावी व्यवस्थापन, डेपो व्यवस्थापन, डिजीटल तिकीट प्रणाली, सार्वजनिक खासगी भागीदारी, महसूल वाढ, मेट्रो फिडर सेवांचे एकत्रीकरणाच्या संदर्भात या शहरांमध्ये असलेल्या प्रणालीची हा अभ्यासगट पाहणी करणार आहे.






