हंसराज,भंडारा लाखांदूर :- समान काम, समान वेतन या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लाखांदूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी १७ नोव्हेंबर पासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनामुळे न्यायालयाचे दैनंदिन कामकाज पुर्णपणे ठप्प झाले असून पक्षकार आणि वकिलांची मोठी गैरसोय होत आहे.
राज्यभरातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या संघटनेने पुकारलेल्या या आंदोलनात लाखांदूर न्यायालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी सक्रियपणे सहभागी झाले आहेत. सन २००६ वर्षापासून प्रस्तावित, वेतनवाढ, सुधारित वेतन श्रेणी, सेवाशर्ती जुनी पेंशन योजना आणि विविध वेतन आयोगांच्या शिफारसींची अमलबजावणी या साठी सतत पाठ पुरावा करावा लागत आहे. समान कामासाठी समान वेतन लागू करण्याच्या मागण्यांबाबत शासनाने अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही. या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
सकाळ पासूनच कर्मचाऱ्यांनी न्यायलय परीसरात एकत्र येत आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी घोषणाबाजी केली. जो पर्यंत शासन सकारात्मक निर्णय घेत नाही, तो पर्यंत हा संप मागे घेतला जाणार नाही. असा ठाम निर्धार आंदोलक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
संपामुळे न्यायालयीन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.






