– खातगाव फाट्याजवळ अपघात; उपचारासाठी चंद्रपूरच्या टीटीसीत दाखल
चंद्रपूर :- नागपूर महामार्गावर सिंदेवाहीजवळील खातगाव फाट्याजवळ कारच्या धडकेत एक वाघ गंभीर जखमी झाला. गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे १०.१५ वाजता हा अपघात घडला. जखमी वाघाला प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये (टीटीसी) हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आशिष सुधाकर संतोषवार (रा. बल्लारशहा) हे एमएच-३४/सीएक्स-४००६ क्रमांकाच्या कारने कुटुंबासह नागभीड येथून चंद्रपूरकडे जात होते. दरम्यान, खातगाव फाट्याजवळ अचानक वाघ रस्त्यावर आल्याने कारची त्याला जोरदार धडक बसली. या अपघातात वाघ गंभीर जखमी झाला.
अपघातानंतर कारचालक आशिष संतोषवार यांनी घटनास्थळावरून निघून न जाता तिथेच थांबून वनविभागाला घटनेची माहिती देण्यास सहकार्य केले. दरम्यान, जखमी वाघाला सुरुवातीला सावरगाव येथे नेऊन प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूरच्या टीटीसीमध्ये हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी वाघाला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. वनविभागाच्या पथकाने परिस्थिती हाताळत वाघाला उपचारासाठी रवाना केले. सध्या टीटीसीमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत.






