– खडी गंमत, तुर्रा-कलंगी आणि लोककलांच्या सादरीकरणाने रंगली तीन दिवसीय मंडई; ग्रामीण संस्कृतीचे घडले दर्शन.
खापा, वार्ताहर :- ग्रामीण संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे, पारंपरिक लोककलांना व्यासपीठ मिळावे आणि नागरिकांना मनोरंजनाची पर्वणी अनुभवता यावी, या उद्देशाने खापा शहरात विविध ठिकाणी आयोजित तीन दिवसीय मंडई उत्सवाचा उत्साहात समारोप झाला. नवयुवक व्यापारी मित्र मंडळ व शहरवासीयांच्या वतीने बँक ऑफ बडोदा समोरील प्रांगणात, माताखेडी येथे संत पतिराम महाराज नाट्य मंडळाच्या वतीने, तर भवानी माता मंदिर चौकात व्यापारी संघटना व बादशाह क्रिकेट क्लबच्या वतीने मंडई उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
“बँक ऑफ बडोदा समोरील मंडई महोत्सवात विविध कार्यक्रम”
नवयुवक व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित मंडई महोत्सवात बुधवार (दि. १८ नोव्हेंबर) रोजी सायंकाळी निधी पुणेकर (पुणे) यांच्या संचालित ‘लावण्य तारका’ समूहाने आकर्षक लावणी व सांस्कृतिक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी खापा शहरातील विविध शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच लॅक्रॉस या खेळातील प्रतिभावान खेळाडू आस्था स्वाती प्रशांत दहीकर हिचाही विशेष सत्कार करून तिच्या क्रीडा यशाचे कौतुक करण्यात आले.
गुरुवार (दि. १९ नोव्हेंबर) रोजी खंडाळा (निलज), ता. पारशिवनी येथील ‘क्रांतिज्योती कलंगी मंडळा’चे शाहीर सूरज नवघरे व संच यांनी विविध पारंपरिक कलाप्रकार सादर केले. त्यानंतर चिचाळ, ता. पवनी, जि. भंडारा येथील ‘राष्ट्रीय खडीगंमत स्वतंत्र सफेद निशाण मंडळा’च्या शिवानी उर्फ अंजुता विखिल सुखदेवे व संच यांनी विनोदी आणि समाजप्रबोधनपर ‘दुय्यम खडी गंमत’ सादर केली. या कलावंतांनी आपल्या सादरीकरणातून विविध सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकत जनजागृती केली.
शुक्रवार (दि. २० नोव्हेंबर) रोजी भुवन लिल्हारे (वडसा, गडचिरोली) यांच्या संचालित ‘मी शुक्राची चांदणी डान्स व लावणी’ समूहाने लावणी आणि सांस्कृतिक नृत्याचे आकर्षक सादरीकरण करून महोत्सवाची रंगत वाढविली.
“माताखेडी येथे लावणी व खडी तमाशाची मेजवानी”
माताखेडी येथे संत पतिराम महाराज नाट्य मंडळाच्या वतीने आयोजित मंडई उत्सवात बुधवार (दि. १८ नोव्हेंबर) रोजी नागपूर येथील लहानशा मेश्राम यांच्या संचालित ‘लावण्य अप्सरा’ लावणी रेकॉर्डिंग डान्स ग्रुपने नृत्य सादर केले. गुरुवार (दि. १९ नोव्हेंबर) रोजी लाखनी (सोमलवाडा), जि. भंडारा येथील ‘अमर गायन पार्टी तुर्रा घराणे’चे शाहीर आर्यन नागदेव व संच तसेच किकरीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया येथील ‘पंचशील गायन पार्टी’च्या शाहिरा सोनू गायधने व संच यांनी दुय्यम खडा तमाशाचे सादरीकरण केले. पारंपरिक गायन, लोककला आणि मनोरंजनातून उपस्थितांचे मनोरंजन करण्यात आले.
“भवानी माता मंदिर चौकातही सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत”
भवानी माता मंदिर बाजार चौक येथे व्यापारी संघटना व बादशाह क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित मंडई उत्सवात बुधवार (दि. १८ नोव्हेंबर) रोजी नागपूर येथील लहानशा मेश्राम यांच्या ‘लावण्य अप्सरा डान्स लावणी’ समूहाने रेकॉर्डिंग डान्स सादर केला.
गुरुवार (दि. १९ नोव्हेंबर) रोजी बच्छेरा (टोली), ता. पारशिवनी येथील शाहीर मनोहर पनवारे व संच यांच्या ‘न्यू आझाद तुर्रा पार्टी’ने पारंपरिक लोककलेचे सादरीकरण केले. तसेच पंचधार, ता. काटोल येथील शाहीर शोभा उर्फ मंदा संजय बागडे व कलाकार संच यांच्या ‘कलांगी मंडळ विदर्भाची खडी गंमत’ या समूहाने लोककला व जनजागृतीपर दुय्यम खडी तमाशा सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
खापा शहरातील विविध ठिकाणी आयोजित मंडई उत्सवामुळे नागरिकांना पारंपरिक लावणी, तुर्रा-कलंगी, खडी गंमत आणि लोककलेचा आनंद घेता आला. आधुनिक मनोरंजनाच्या काळातही पारंपरिक ग्रामीण कला व संस्कृती जिवंत ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या मंडई उत्सवाच्या माध्यमातून झाले. तीन दिवस चाललेल्या या सांस्कृतिक पर्वाला शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.






