– आमदार चरणसिंग ठाकूर यांना निवेदन
काटोल :- काटोल व नरखेड तालुक्यातील महावितरणच्या कंत्राटी कामगारांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना ESIC अंतर्गत वैद्यकीय सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हाव्यात, यासाठी काटोल येथे ESIC दवाखाना सुरू करण्याची मागणी तांत्रिक कामगार युनियन (५०५९) प्रणित तांत्रिक ॲप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशन (७२८) च्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात काटोल विधानसभा क्षेत्राचे आमदार चरणसिंग ठाकूर यांना निवेदन देण्यात आले.महावितरण अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांच्या वेतनातून नियमितपणे ESIC चे योगदान कपात केले जाते. मात्र, काटोल परिसरात ESIC दवाखान्याची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे कामगारांना व त्यांच्या कुटुंबीयांना उपचारासाठी नागपूर किंवा इतर दूरच्या ठिकाणी जावे लागते. विशेषतः विद्युत क्षेत्रातील जोखमीचे काम करताना अपघात किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने उपचार मिळण्यात अडचणी निर्माण होतात.त्यामुळे काटोल शहरात स्वतंत्र ESIC दवाखाना सुरू करावा, दवाखाना सुरू होईपर्यंत ESIC संलग्न रुग्णालयाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, तसेच कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना मोफत वैद्यकीय उपचार, औषधे आणि आवश्यक तपासण्यांची सुविधा मिळावी, अशा प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.यावेळी उकेश चौहान, जिल्हा नियोजन समिती सदस्य आणि विक्की भा. कावळे, राज्य कार्याध्यक्ष, तांत्रिक ॲप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशन (७२८) उपस्थित होते.





