– जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात नागपूर दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नागपूर यांच्या कार्यालयात दिवाळी अंक २०२६ च्या प्रदर्शनाचे उद्घाटन १९ नोव्हेंबर करण्यात आले. जिल्हा नियोजन अधिकारी संजय कडू यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. दिवाळी हा प्रकाशाचा, आनंदाचा आणि मांगल्याचा सण असला, तरी मराठी माणसासाठी दिवाळी म्हणजे फराळ, आकाशकंदील, पणत्या यांच्यासोबतच दर्जेदार साहित्याची मेजवानी देखील असते. दिवाळीच्या निमित्ताने प्रकाशित होणारे दिवाळी अंक हे वाचकाचे बौद्धिक खाद्य आहेत, केवळ मनोरंजनाचे साधन नसून मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, विचार आणि सामाजिक प्रबोधन यांचा अनमोल ठेवा आहेत. असे असे प्रतिपादन उद्घाटक संजय कडू यांनी केले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्रंथालय भारती चे कार्याध्यक्ष आणि राज्य ग्रंथ निवड समितीचे सदस्य रवींद्र गोविंद पांडे हे उपस्थित होते. या दिवाळी अंकाच्या प्रदर्शनात महाराष्ट्रातील विविध भागातून प्रकाशित झालेले दिवाळी अंक ठेवण्यात आले आहे. या प्रदर्शनात विविध दर्जेदार अंकाचा समावेश असल्याने वाचकांसाठी ही मेजवानीच ठरणार आहे, महाराष्ट्र राज्यातील दिवाळी अंकाची समृद्ध परंपरा जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या कार्यालयाने टिकवून ठेवण्याचा चांगला प्रयत्न केला आहे असे रवींद्र गोविंद पांडे यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी यांनी ग्रंथालयबाबत माहिती देऊन या ग्रंथालयाचे वर्गणीदार सभासद व्हावे असे आवाहन केलेत, दिवाळी अंक प्रदर्शनात विविध विषयावरील १०० हून अधिक दिवाळी अंक.. किशोर, मुलांचे मासिक, मौज मिडिया वाच, दीपावली, हंस, ललित, गृहलक्ष्मी, ग्रंथ भारती, विनोदी, माहेर, आवाज, जत्रा, ग्रह्णीत, उपलब्ध आहेत हे प्रदर्शन १९ ते २५ नोव्हेंबर पर्यंत शासकीय सुट्ट्या वगळता सर्वांसाठी निशुल्क खुले राहणार आहे. आभार प्रदर्शन सुर्यकांत भोसले यांनी केले. या कार्यक्रमाला ग्रंथालय भारती चे केंद्रीय कोषाध्यक्ष वामन निचंते, सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघटनेचे नेते नंदू बनसोड, प्रमोद रोडे, शांताराम लाखे तसेच कार्यालयीन कर्मचारी वर्ग आणि वाचक, विध्यार्थी उपस्थित होते.






