– नवीन, नूतनीकरणासह त्रुटी असलेले अर्जही मुदतीत पूर्ण करण्याचे आवाहन
गडचिरोली :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय वसतिगृह प्रवेश योजना आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील ऑनलाइन अर्जांसाठी ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी या मुदतीत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त डॉ सचीन मडावी यांनी केले आहे.
या मुदतवाढीनुसार विद्यार्थ्यांना दोन्ही योजनांसाठी नवीन तसेच नूतनीकरणाचे अर्ज ऑनलाइन सादर करता येणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज केलेले नाहीत, त्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता अर्ज भरावेत.
दरम्यान, आवश्यक कागदपत्रे किंवा माहितीतील त्रुटींमुळे काही विद्यार्थ्यांचे अर्ज ‘Sent Back’ स्थितीत आहेत. अशा विद्यार्थ्यांनी अर्जातील त्रुटी तातडीने दूर करून संबंधित महाविद्यालयामार्फत किंवा विहित प्रक्रियेनुसार ३० नोव्हेंबरपूर्वी अर्ज ‘Forward’ झाल्याची खात्री करावी. केवळ त्रुटींची पूर्तता करणे पुरेसे नसून अर्जाची पुढील प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे.
३० नोव्हेंबर ही अंतिम मुदत असून, त्यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही. तसेच मुदतीनंतर नवीन अर्ज सादर करण्याची किंवा अर्जातील त्रुटी दूर करण्याची संधी उपलब्ध होणार नाही.
विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org/ या संकेतस्थळावर अर्ज सादर करावेत. अर्ज भरताना किंवा त्रुटींची पूर्तता करताना तांत्रिक अडचणी आल्यास मुदतीपूर्वी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.






