खापा, वार्ताहर :- संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खापा शहरातील पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी उपजिल्हाधिकारी प्रदीप उबाळे यांनी खापा नगरपरिषद कार्यालयास दि. २० नोव्हेंबर शुक्रवाराला भेट देऊन पाणीपुरवठा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी त्यांनी नगरपरिषद कार्यालयात संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून शहरातील पाणीपुरवठ्याच्या प्रमुख समस्या, उपलब्ध जलसाठा आणि भविष्यात उद्भवू शकणाऱ्या पाणीटंचाईवर उपाययोजनांबाबत माहिती जाणून घेतली. तसेच कन्हान नदीपात्राची प्रत्यक्ष पाहणी करून पाणीपुरवठा योजना व जॅकवेल प्रकल्पाचीही पाहणी केली.
शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व शाश्वत ठेवण्यासाठी जुन्या शाश्वत जलस्रोत असलेल्या विहिरींचे पुनर्जीवन करणे, नवीन ट्यूबवेल उभारणे तसेच मॉयल परिसरातील उपलब्ध विहिरीतील पाण्याचा उपयोग करून नवीन वस्ती व मॉयल परिसरात पाणीपुरवठा करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी उपलब्ध जलस्रोतांचे योग्य नियोजन करून आवश्यक त्या तातडीच्या उपाययोजना करण्यावर यावेळी भर देण्यात आला. खापा शहरातील नागरिकांना भविष्यात पाणीटंचाईचा त्रास होऊ नये, यासाठी नगरपरिषद प्रशासनाकडून दीर्घकालीन व शाश्वत पाणीपुरवठा उपाययोजनांना प्राधान्य देण्यात येत आहे.
या आढावा दौऱ्याप्रसंगी नगराध्यक्ष पियूष बुरडे, मुख्याधिकारी सचिन राऊत, उपाध्यक्ष सुनील पाहुणे, पाणीपुरवठा अभियंता राहुल चव्हाण, कर निरीक्षक ज्ञानेश्वर सोनवणे, यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.





