– भंडारा सायबर पोलिसांची मोठी कारवाई; पुणे व पालघरमधून आरोपी निष्पन्न, फसवणुकीची रक्कम हस्तगत
हंसराज,भंडारा :- ऑनलाइन माध्यमातून तोतयागिरी करत नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोन स्वतंत्र सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्यात भंडारा सायबर पोलिसांना यश आले आहे. तांत्रिक व सखोल तपासाअंती पोलिसांनी पुणे आणि पालघर जिल्ह्यातील आरोपींचा शोध लावला असून, फसवणुकीची रक्कम हस्तगत करून फिर्यादींना परत करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
‘मॅट्रिमोनी’वरून बनावट डॉक्टरची फसवणूक पहिल्या प्रकरणात, आरोपीने ‘मराठी मॅट्रिमोनी’ (Marathi Matrimony) या अॅपवर ‘sunil jadhao’ नावाने बनावट आयडी तयार करून फिर्यादीशी संपर्क साधला होता. आपण एमबीबीएस डॉक्टर असल्याचे भासवून त्याने फिर्यादीचा विश्वास संपादन केला आणि हॉस्पिटल बांधकामाचे कारण पुढे करून ‘फोनपे’द्वारे एकूण ३० हजार १ रुपये उकळून फसवणूक केली. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१९(२) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(क), ६६(ड) अन्वये गुन्हा (अपराध क्रमांक ०४/२०२५) दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान संबंधित व्यक्ती डॉक्टर नसून तोतया असल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्यात सुनिल गोपाळ जाधव (वय ३५ वर्षे, रा. अमृत्ता नगर, इंदोरी, ता. मावळ, जि. पुणे) हा आरोपी आढळून आला. पोलिसांनी आरोपीकडून ३० हजार रुपये व गुन्ह्यात वापरलेला मोबाईल हस्तगत केला आहे.
खोट्या अपघाताचा बनाव करून २० हजारांचा गंडा दुसऱ्या प्रकरणात, आरोपीने फिर्यादी व त्यांच्या मित्राला फोन करून अपघाताची खोटी माहिती दिली. त्यानंतर त्याने स्वतः कधी पेट्रोलपंप मालक, कधी अॅम्ब्युलन्स चालक तर कधी तलाठी असल्याचे भासवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्याने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर यूपीआयद्वारे एकूण २० हजार रुपये जमा करवून घेत फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशन, भंडारा येथे भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(ड) अन्वये गुन्हा (अपराध क्रमांक ०९/२०२५) नोंदविण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या तपासात रविकांत मधुकर फसाळे (वय ३३ वर्षे, रा. मोहाडा, पो. मोरचोडी, ता. मोखाडा, जि. पालघर) हा आरोपी निष्पन्न झाला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ४ हजार रुपये हस्तगत केले असून, उर्वरित १६ हजार रुपये ‘एमआरएम’ (MRM) पोर्टलच्या माध्यमातून फिर्यादीस परत करण्यात आले आहेत.
या पथकाने केली कारवाई सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, तसेच पोलीस निरीक्षक संजय गायकवाड व पोलीस निरीक्षक शतीश बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या तपासात सायबर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक रुचिरा पात्रे, साहाय्यक फौजदार राजेश गजभिये, पोलीस हवालदार पराग राऊत, दिनेंद्र आंबेडारे, शैलेश बेदूरकर आणि चालक पोलीस हवालदार विजय मदारकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.






