हंसराज,भंडारा लाखनी :- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केसलवाडा फाटा परिसरात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई करत एकूण ४५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाखनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सपोनि नागलोत पथकासह गस्त घालत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून अवैध रेती वाहतुकीची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने मौजा केसलवाडा फाट्याजवळ सापळा रचून ही कारवाई केली. यावेळी पिवळ्या रंगाचा अशोक लेलँड टिप्पर (क्र. MH 36 AA 4454) कोणताही परवाना नसताना शासकीय क्षेत्रातील रेतीची चोरटी वाहतूक करताना आढळला. पोलिसांनी ४५ लाखांचा टिप्पर व ३० हजारांची सुमारे ५ ब्रास रेती जप्त केली.
याप्रकरणी टिप्पर चालक मनोज ज्ञानेश्वर बारस्कर (वय ३४) व मालक हरीश लक्ष्मण शेंडे (वय ४०, दोघे रा. मरेगाव, ता. लाखनी) यांच्याविरुद्ध लाखनी पोलीस ठाण्यात अपराध क्र. ५६४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०२(२), ४९, सहकलम ४७, ४८ महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम व कलम १५ पर्यावरण संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि पो.नि. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नागलोत व पो.हवा. वरकडे यांनी केली. पुढील तपास लाखनी पोलीस करीत आहेत.






