हंसराज,भंडारा मोहाडी :- तालुक्यातील निलज खुर्द येथे मंडईनिमित्त आयोजित मराठी लावणीच्या कार्यक्रमात परवानगीच्या अटींचे जाणीवपूर्वक उल्लंघन करून हिंदी गाण्यांवर अश्लील नृत्य सादर केल्याप्रकरणी करडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत आयोजकासह ‘सितारा डान्स ग्रुप’चे मालक आणि कलाकारांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
निलज खुर्द येथे १६ नोव्हेंबर २०२६ रोजी मंडईनिमित्त मराठी लावणी कार्यक्रमासाठी प्रशासनाची परवानगी घेण्यात आली होती. मात्र, परवानगी आदेशातील अटी व शर्तींचे उल्लंघन करून ‘सितारा डान्स ग्रुप’च्या कलाकारांनी लावणीऐवजी हिंदी गाण्यांवर अश्लील नृत्य केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी आयोजक विलास शेवकराम बांते (वय ४०, रा. निलज खुर्द, ता. मोहाडी) तसेच ‘सितारा डान्स ग्रुप’चे मालक व इतर कलाकारांविरुद्ध करडी पोलीस ठाण्यात अपराध क्र. २९५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम २९६, ३(५) सहकलम ११०, ११७, १३१ महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील मंडई व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजकांनी प्रशासनाच्या सर्व अटी व शर्तींचे काटेकोर पालन करावे. नियमांचे उल्लंघन करून अश्लील नृत्य किंवा कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणारे प्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा भंडारा पोलिसांनी दिला आहे.






