spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भंडारा येथील ‘लेघे ज्वेलर्स’ चोरीचा छडा; नागपुरातील आरोपीसह विधीसंघर्षित बालक ताब्यात वरठीतील दुचाकी चोरीचा गुन्हाही उघड; तीन दिवसांच्या तांत्रिक तपासाअंती पोलिसांना यश

हंसराज,भंडारा :- शहरातील संविधान चौकातील ‘लेघे ज्वेलर्स’चे शटर फोडून ५ लाख ३३ हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात भंडारा पोलिसांना यश आले आहे. तीन दिवस सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषण करून पोलिसांनी नागपुरातील आरोपीला अटक केली असून एका विधीसंघर्षित बालकासही ताब्यात घेतले आहे. या कारवाईत वरठी येथील दुचाकी चोरीचा गुन्हाही उघडकीस आला आहे.

१३ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री २.३० ते ३.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ‘लेघे ज्वेलर्स’चे शटर फोडून ५ लाख ३३ हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान, आरोपी दुचाकीने नागपूर दिशेकडे पळून गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ, भंडारा शहर, नागपूर महामार्ग आणि नागपूर शहरातील शासकीय व खाजगी सीसीटीव्ही फुटेजची तीन दिवस सलग तपासणी केली. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणावरून आरोपी नागपूरच्या गिट्टीखदान परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी गणेश उर्फ गणू वाघाडे (रा. हजारीपहाड, गिट्टीखदान, नागपूर) याला अटक केली असून, १७ नोव्हेंबर रोजी एका विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेतले. या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण दोन आरोपींना अटक करण्यात आली असून विधीसंघर्षित बालकास बाल निरीक्षण गृहात दाखल केले आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर प्लस दुचाकी व चोरीचा काही मुद्देमाल जप्त करण्यात आला असून उर्वरित मुद्देमालाचा तपास सुरू आहे.

तपासात आरोपी रेल्वेने वरठी रेल्वे स्टेशनवर आले होते व तेथून दुचाकी चोरून त्यांनी भंडाऱ्यात येऊन चोरी केल्याचे उघड झाले. यामुळे वरठी पोलीस ठाण्यात दाखल असलेला दुचाकी चोरीचा गुन्हाही (अप. क्र. ५१२/२०२६, कलम ३०३(२) बीएनएस) उघडकीस आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, सहा. पोलीस अधीक्षक तेजस सारडा व पो.नि. उल्हास भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि आशिष बोरकर, पो.हवा. कुरंजेकर, अंकुश पुराम, अनुप वाल्दे, पो.शि. रोहन काळे, सुमीत पेशने व रोहीत अंबादे यांनी केली.

Popular Articles