spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ओेटीएससाठी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध

यवतमाळ :- महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६ ही योजना सुरु केली आहे. या योजनेमध्ये एकवेळ समझोता (ओटीएस) आधार प्रमाणीकरणासाठी जिल्ह्यातील 8240 लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. ही केवळ एकच यादी नसून बँकांकडे आलेल्या माहितीचे संगणकीय संस्करण करण्यात येईल व पात्र शेतक-यांच्या याद्या यापुढेही प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

प्रसिद्ध करण्यात आलेली यादी ही गावपातळीवर ग्रामपंचायत तसेच बँकेच्या शाखेत व विकास संस्थेच्या शाखेमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

एकवेळ समझोता (ओटीएस) अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी २ लाख रुपयांवरील शेतकऱ्यांच्या हिश्याची रक्कम बँकेत भरल्यानंतर २ लाख रुपयांचा कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. बँकाकडील महितीचे संगणकीय संस्करण करुन राज्यातील एकूण १,६९,८२० पात्र शेतकऱ्यांची यादी दि. २० नोव्हेंबर २०२६ रोजी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

एक वेळ समझोता अंतर्गत पात्र शेतकऱ्याच्या कर्जखात्यासंदर्भात कार्यवाही अवलंबली जाणार आहे. प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये शेतकऱ्यांचे नाव, गाव, विशिष्ट क्रमांक, बँक कर्जखाते तपशिल, दि.३१ मार्च २०२६ अखेरच्या थकबाकीची रक्कम, एकवेळ समझोता प्रमाणे थकबाकीची रक्कम, ओटीएस प्रमाणे शेतकऱ्याने भरावयाची रक्कम व शासनामार्फत देण्यात येणाऱ्या लाभाची रक्कम नमुद आहे.

शेतकऱ्याने प्रसिद्धी यादीतील तपशिल तपासून त्यांच्या हिश्याची २ लाख रुपयांवरील रक्कम संबंधित बँकेत भरणा करावयाची आहे. ज्या शेतकऱ्यांच्या कर्जखाते एकाच बँकेत आहे अशा शेतकऱ्यांनी यादीत रकाना क्र. ११ मध्ये नमूद केलेली रक्कम संबंधीत बँकेच्या कर्जखात्यात भरणा करावी.

ज्या शेतकऱ्यांची एकापेक्षा जास्त कर्जखाती आहेत अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्शाची रक्कम त्यांच्या कोणत्याही कर्ज खात्यात भरण्याची सुविधा आहे. परंतु शेतकऱ्यांने एका खात्यामध्ये यादीतील रकाना क्र. १० मध्ये नमुद पेक्षा जास्त रक्कम भरु नये. (एकापेक्षा जास्त कर्जखाती असलेल्या शेतकऱ्याने त्याच्या हिश्श्याची रक्कम भरत असताना ओटीएस योजने प्रमाणे बँकेस देय असलेल्या रकमेपेक्षा जास्तची रक्कम त्या खात्यात भरु नये) शेतकऱ्यांनी योग्य ती माहिती घेऊन बँकेत रक्कम जमा करावी. बँकेच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना याबाबत मार्गदर्शन करावे, असेही निर्देश देण्यात आले आहे.

बँकेमध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची २ लाख रुपयांवरील रक्कम संबंधीत बँकेत भरल्यानंतर संबंधीत बँकेने याबाबतची माहिती पोर्टलवर अद्ययावत करावी.

शेतकऱ्यांनी त्यांच्या कर्जाच्या २ लाख रुपयांवरील कर्जाची रक्कम भरावयाची अंतिम मुदत दि. ३१ मार्च २०२७ पर्यंत राहणार आहे.

यादीत नमूद असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची रक्कम बँकेत भरणा केल्याची अद्ययावत माहिती दर शुक्रवारी बँकेमार्फत पोर्टलवर अपलोड केली जाईल. बँकेने माहिती पोर्टलवर अपलोड केल्याचे शेतकऱ्यास कळवायचे आहे.

महा आयटी मार्फत अशा प्रकरणी शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची रक्कम यादी प्रमाणे भरणा केल्याची खात्री पोर्टलवर करण्यात येईल. यादीत नमूद केलेली २ लाख रुपयांवरील रक्कम शेतकऱ्यांनी संबंधीत बँकेत भरली असल्यास अशा शेतकऱ्यांना थकबाकीचे अद्ययावतीकरण झाल्याच्या तीन दिवसानंतर संबंधीत शेतकऱ्यासाठी आधार प्रमाणीकरण करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल.

योजनेच्या निकषानुसार अशा शेतकऱ्यांसाठी अॅग्रीस्टॅक नोंदणी करणे आवश्यक असल्याने ज्या शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक नोंदणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांसाठीच आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल.

ज्या शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक नोंदणी केलेली आहे व आधार प्रमाणीकरण केलेले आहे अशा शेतकऱ्यांना निकषांनुसार व संबंधीत बँकेत त्यांच्या हिश्श्याची भरलेली रक्कम भरल्यानंतर रु.२.०० लाखाचा लाभ हस्तांतरीत करण्यात येईल. शासनाने २ लाख रुपयांची रक्कम वर्ग केल्यानंतर शेतकऱ्याची कर्जमुक्ती होणार आहे.

योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये मयत झालेल्या तसेच वयस्कर व बोटांच्या ठशाची नोंद होत नसल्याबाबत लाभार्थ्यांना कर्ज मुक्तीचा लाभ देण्याचे अनुषंगाने दि. १९ आगस्ट २०२६ रोजीची मानक कार्यप्रणाली निर्गमित करण्यात आलेली आहे.

Popular Articles