– विद्यापीठाच्या कॅन्टीनला १ लाख दंड
मुंबई :- वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय)मधील अन्न आस्थापनेचा परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला. स्वच्छता आणि आरोग्यविषयक तरतुदींचे गंभीर उल्लंघन आढळल्याने ही कारवाई करण्यात आली. तर, मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट येथील कॅन्टीनवर कारवाई करून एक लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कॅन्टीनचा कोणताही वैध अन्न व्यवसाय परवाना नसताना व्यवसाय सुरू असल्याचे तपासणीत आढळले.
एफडीएने बोरीवली येथील मराठा चिकन सप्लायर्स, देवनार व्हिलेज रोड, गोवंडी येथील वेल्वेट फाईन चॉकलेट्स, टाटानगर येथील शाने इलाही बेकरी अँड स्टोअर्स, लोअर परळ येथील ब्रिटिश ब्रूइंग कंपनी आणि प्रभादेवी येथील क्युअर फूड्स इंडिया या आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवानेही निलंबित केले आहेत. अँटॉप हिल आणि टिळकनगर परिसरात प्रतिबंधित अन्नपदार्थ बाळगल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आता ‘त्यांना’ नोटीस पाठविणार का?
सिनेट सदस्य प्रदीप सावंत म्हणाले, स्वच्छ व सुरक्षित अन्न उपलब्ध मिळावे याकरिता सातत्याने विद्यापीठ प्रशासनाला तक्रार करीत होतो.’ कित्येक वेळा फोर्ट कॅम्पस, कलिना कॅम्पस, मादाम कामा मुलींचे वसतिगृह, जमनालाल बजाज मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट येथील कॅन्टीनचे फोटो देखील दाखवले. परंतु विद्यापीठ प्रशासन तक्रारींची दखल घेत नसल्याने अखेर एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन तक्रार केली. कारनामे माध्यमांसमोर आणल्यावर सिनेट सदस्यांवर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येते. आता मुंढे यांना सुद्धा नोटीस बजावणार का?’ असा प्रश्न त्यांनी विचारला.






