spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आद्यब्रह्मवादिनी फाऊंडेशनतर्फे सामुदायिक तुलसी-दामोदर विवाह सोहळा उत्साहात संपन्न

नागपूर :- भारतीय संस्कृतीतील मांगल्य, भक्तिभाव आणि परंपरेचे प्रतीक असलेला सामुदायिक श्री तुलसी- दामोदर विवाह सोहळा आद्यब्रह्मवादिनी फाऊंडेशनतर्फे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. संस्थेच्या मुख्य संचालिका आरती महाजन यांच्या संकल्पनेतून रविवारी २२ नोव्हेंबर रोजी दीनदयाल नगर येथील श्री पांडुरंगेश्वर शिव मंदिराच्या सभामंडपात गोरज मुहूर्तावर या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या मंगल सोहळ्याला सुमारे २५० हून अधिक भाविकांची उपस्थिती लाभली. कार्तिक महिन्यात साजरा होणारा तुलसी विवाह हा भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा धार्मिक आणि पारंपरिक सोहळा आहे. घराघरांत कुळाचार म्हणून साजऱ्या होणाऱ्या या मंगल सोहळ्याचा आनंद समाजातील अधिकाधिक लोकांना वऱ्हाडी म्हणून अनुभवता यावा, या उद्देशाने फाऊंडेशनने सामुदायिक विवाह सोहळ्याची संकल्पना प्रत्यक्षात आणली.

कार्यक्रमाची सुरुवात तुलसी पूजनाने झाली. त्यानंतर श्री दामोदर स्वरूपातील श्रीकृष्णाचा वाजंत्रीच्या गजरात वाजतगाजत वरधावा काढण्यात आला. वऱ्हाडींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मिरवणुकीत विशेष उत्साह निर्माण झाला. वधूपक्षाकडून वरपक्षाचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. ऊसांनी सजविलेल्या आकर्षक मंडपात, सनईच्या मंगल स्वरांत, मंत्रोच्चार आणि शंख- घंटांच्या निनादात श्री तुलसी आणि भगवान श्रीकृष्ण यांचा विवाह विधी पार पडला. आद्यब्रह्मवादिनीच्या सखी अरुणा जोशी आणि अरुणा वैद्य यांनी सादर केलेल्या सुरेल मंगलाष्टकांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांचे भावपूर्ण गायन सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले. यावेळी चिमुकल्या अस्मि काळे हिने केलेले दमदार शंखवादन उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारे ठरले. विवाहानंतर वरमाय अंजली देशपांडे यांचा वधूमाय  वैशाली चिमोटे यांनी पारंपरिक मानपान केला. तसेच पाच सुवासिनींच्या ओट्या भरण्याचा विधी पार पडला. पांडुरंगेश्वर मंदिराचे ब्रह्मपुरीकर गुरुजी यांनी विवाहाचे पौरोहित्य केले. ओटी भरण्याच्या कार्यक्रमात अरुणा जोशी यांनी सुरेल आवाजात विहिण गायन सादर केले. त्यांच्या मंगलाष्टक आणि विहिण गायनाने उपस्थितांची मने जिंकली. धार्मिक विधींनंतर सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत वाढली. राधिका कुळकर्णी हिने गणेश वंदना सादर केली, तर पल्लवी नरकाडे यांच्या श्रीसखी चमूने आकर्षक पाऊलभजन सादर केले. यानंतर उपस्थित महिलांनी ‘किती सांगू मी सांगू कुणाला’ आणि ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी’ या लोकप्रिय गीतांवर फेर धरत आनंदोत्सव साजरा केला. या सोहळ्यातील विशेष उपक्रम म्हणून सविता जोशी यांनी उपस्थित दहा ते बारा लहान मुलींना तुळशीची छोटी रोपे भेट दिली. तुळशीचे धार्मिक आणि पर्यावरणीय महत्त्व सांगून या रोपांचे संगोपन करावे आणि वाढलेल्या रोपांसोबतचे छायाचित्र पाठवावे, असे आवाहन त्यांनी केले. या उपक्रमातून बालमनात निसर्गप्रेम आणि पर्यावरण संवर्धनाचे बीज रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रभावी निवेदन सौ. अरुंधती महाजन यांनी केले, तर संपूर्ण सोहळ्यातील सुंदर क्षणांचे छायाचित्रण नीलम जोशी यांनी केले. रूखवताची आकर्षक सजावट माऊली क्रिएशन्स यांनी, मुख्य रांगोळी अश्विनी किन्हीकर यांनी, तर वधू- वरांची साजसजावट आणि तुळशीची रांगोळी अबोली भाटवडेकर यांनी केली. प्रसाद वितरण तसेच वऱ्हाडींसाठी बुंदी लाडूच्या डब्यांची व्यवस्था श्रीराम केटरर्स यांनी केली. संस्थेच्या संचालिका आरती महाजन आणि अरुंधती महाजन यांनी आयोजनाची धुरा सांभाळली. संस्थापिका डॅा. वृषाली शिलेदार, सहसंस्थापिका डॉ. योगिता कस्तुरे, संचालिका मेघा जोशी, वैशाली चिमोटे,अंजली देशपांडे, संघटिका डॉ. ज्योती शिवलकर आणि सुनीती मोहरील यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच उज्वला गोळे, लीना लोटे, सीमा घिसाड, शिल्पा नाईक, हेमांगी जोशी, प्रज्ञा बेहेरे, सुवर्णा अशिरगडे, मानसी देशपांडे, शिवानी दिवाळे, डॉ. अश्विनी उपाध्ये आणि सविता जोशी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.पांडुरंगेश्वर शिव मंदिर समितीचे अध्यक्ष दिलीप कातरकर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. मंदिर समितीचे सदस्य, परिसरातील नागरिक आणि आद्यब्रह्मवादिनी फाऊंडेशनचे सदस्या यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून मंगलमय वातावरणाचा आनंद घेतला. प्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. पारंपरिक विवाह संस्कार, भक्तिभाव, सांस्कृतिक आनंद आणि सामाजिक एकोपा यांचा सुंदर मिलाफ घडविणारा हा देखणा व नाविन्यपूर्ण उपक्रम असल्याची कौतुकाची पावती उपस्थित नागरिकांनी दिली.

Popular Articles