– मेटाला दिला सात दिवसांचा अल्टिमेटम
मुंबई :- सत्ताधारी व्यवस्थेवर टीका करणाऱ्या आवाजांना दाबण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. हैदराबाद, गुरुग्राम आणि मुंबई येथील ‘मेटा’च्या (Meta) कार्यालयांबाहेर झालेल्या आंदोलनांनंतर, भारतीय युवक काँग्रेसने मेटाला या प्रकरणी स्पष्टीकरण देण्यासाठी सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या संदर्भात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने पत्रकार परिषदेचे आयोजन करत आपली भूमिका स्पष्ट केली.
युवक काँग्रेसचे आरोप आणि भूमिका:
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स हे भारताच्या लोकशाही संवादाचे अविभाज्य भाग बनले आहेत. मात्र, सरकारी आदेशानुसार भारतीय सोशल मीडिया खाती आणि राजकीय मजकूर रोखून धरला जात असून, त्यावर मनमानी निर्बंध लादले जात असल्याची गंभीर चिंता युवक काँग्रेसने व्यक्त केली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे राजकीय सोयीवर अवलंबून असू शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले.
मेटाला विचारलेले चार मूलभूत प्रश्न:
या पत्रकार परिषदेद्वारे युवक काँग्रेसने मेटाकडे खालील चार महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत:
१. गेल्या सहा महिन्यांत सरकारी आदेशानुसार किती भारतीय सोशल मीडिया खाती रोखण्यात आली किंवा त्यांच्यावर निर्बंध घालण्यात आले?
२. राहुल गांधींचा उल्लेख करणाऱ्या किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करणाऱ्या पोस्ट्सवरच स्वयंचलितपणे ब्लॉकिंग का लादले जात आहे? मेटाची कंटेंट मॉडरेशन यंत्रणा राजकीय मजकुराला भेदभावपूर्ण वागणूक देत आहे का?
३. विरोधी आवाज, पत्रकार, स्वतंत्र निर्माते आणि सामान्य नागरिकांवर लादलेले सर्व बेकायदेशीर निर्बंध त्वरित मागे घेतले पाहिजेत.
४. मेटाने राजकीय दबावाला बळी न पडता संविधानाचा आदर करावा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या घटनात्मक मूल्यांचे पालन करावे.
“सरकारवर टीका करणे हा गुन्हा नाही, मतभेद म्हणजे देशद्रोह नाही आणि सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे हा एक मूलभूत लोकशाही हक्क आहे,” असे ठाम मत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने या वेळी व्यक्त केले. पारदर्शकता आणि लोकशाही स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी या मागण्यांवर सात दिवसांत प्रतिसाद न मिळाल्यास पुढील भूमिका घेतली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.






