spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

टेंभुरडोहजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाची ॲक्टिव्हाला जोरदार धडक!

– एकाची प्रकृती चिंताजनक, तर दुसरा गंभीर जखमी; अपघातानंतर वाहनचालक पसार.

खापा, वार्ताहर :- खापा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील टेंभुरडोहजवळ मंगळवारी (दि. २४ नोव्हेंबर) रात्री सुमारे ८.१५ वाजताच्या सुमारास अज्ञात वाहनाने ॲक्टिव्हा दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. अपघातानंतर धडक देणारे वाहन घटनास्थळावरून पसार झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, आशिष पांडुरंग अंबाडरे (वय २७, रा. सर्रा, पोस्ट नागलवाडी, ता. सावनेर, जि. नागपूर) आणि आकाश शांताराम कोहडे (वय ३२, रा. तायगाव खैरी, ता. सौसर, मध्यप्रदेश) हे दोघे एमएच ४० डीएम ७८४३ क्रमांकाच्या ॲक्टिव्हा दुचाकीने चारगावच्या दिशेने जात होते. दरम्यान, टेंभुरडोहजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दोघेही दुचाकीवरून रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले.

या अपघातात आशिष अंबाडरे यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. तर आकाश कोहडे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

हितज्योती आधार फाउंडेशनकडून तातडीने मदत

अपघाताची माहिती मयूर जिचकार यांनी सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना दिली. त्यांनी तत्काळ खापा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे यांना घटनेची माहिती कळविली. त्यानंतर हितज्योती आधार फाउंडेशनच्या ॲम्ब्युलन्सने दोन्ही जखमींना तातडीने सावनेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना मेडिकल हॉस्पिटल, नागपूर येथे हलविण्यात आले.

खापा पोलिसांकडून अज्ञात वाहनाचा शोध सुरू

अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे, पोलीस उपनिरीक्षक एकनाथ राठोड आणि पोलीस हवालदार प्रकाश नांदूरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अपघाताची माहिती घेतली असून, धडक देऊन पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध सुरू केला आहे.

दरम्यान, अपघात घडवून जखमींना मदत न करता घटनास्थळावरून पळ काढणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. अपघातग्रस्तांना वेळेत मदत मिळणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाचा शोध घेऊन संबंधित चालकावर कायदेशीर कारवाई होणेही आवश्यक आहे. या घटनेमुळे परिसरातील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, खापा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Popular Articles