ठाणे :- राज्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने आगामी काळात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता राज्य सरकारने आतापासूनच पाणी बचतीचे नियोजन सुरू केले.आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी २६ नोव्हेंबरला विशेष योजना जाहीर करणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी येथे मंगळवारी दिली.
राज्यात १९७२ च्या दुष्काळापेक्षाही गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. धाराशिव जिल्ह्यात अवघा ५.३४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. येथील पाणीटंचाई व चारा नियोजनासाठी मंत्रालयात विशेष बैठक होणार आहे. त्यानंतर मंत्री बावनकुळे यांच्या उपस्थितीत वर्षभरातील पाणीसाठा व चाऱ्याच्या उपलब्धतेचा आढावा घेणार. आगामी विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा करतील, असेही त्यांनी नमूद केले.
संजय राऊत यांनी दोन आमदारांना ठार मारण्याच्या केलेल्या आरोपांवर सरनाईक यांनी उपरोधिक टीका केली. राऊत यांनी राजकीय वक्तव्यांऐवजी ज्योतिषाची भूमिका स्वीकारावी, असा टोला त्यांनी लगावला. मंत्री संजय शिरसाट यांच्या वक्तव्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दखल घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शाखाप्रमुखाच्या व्हिडीओची चौकशी करणार : शिवसेनेच्या शाखाप्रमुखाकडे मोठी रक्कम आढळल्याच्या व्हिडिओ प्रकरणाची चौकशी केली जाईल. तसेच असे व्हिडिओ संदीप देशपांडे यांनाच कसे मिळतात, याचीही चौकशी करण्याची मागणी गृहमंत्र्यांकडे करणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
रोहित पवारांच्या मोर्चावर टीका : सरकार चर्चेसाठी तयार असताना केवळ प्रसिद्धीसाठी आणि राजकीय स्टंटसाठी आंदोलन करणे योग्य नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवश्यक उपाययोजना करण्याची सरकारची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.






