spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जंगलाच्या काळोखात ज्ञानाचा प्रकाश; पेंच व्याघ्र प्रकल्पाची शालेय बस विद्यार्थ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी!

– १२ दुर्गम गावांतील विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित; ॲड. आशिष जयस्वाल यांच्या पुढाकारातून वर्षभरापासून बससेवा सुरू

खापा, वार्ताहर :- पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील दुर्गम गावांमधील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सुरू करण्यात आलेली विशेष शालेय बस सेवा विद्यार्थ्यांसाठी जीवनवाहिनी ठरत आहे. राज्याचे राज्यमंत्री तथा रामटेकचे आमदार ॲड. आशिष जयस्वाल यांच्या विशेष पुढाकारातून आणि पेंच व्याघ्र प्रकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही सेवा गेल्या वर्षभरापासून अविरत सुरू आहे.

नागलवाडी (एकसंघ नियंत्रण) वनपरिक्षेत्रांतर्गत व पारशिवनी तालुका अंतर्गत येणाऱ्या धवलापूर, नरहर, बनेरा, अंबझरी, शिलादेवी, सुवरधारा, चरगाव, अवलेघाट, पळसवली, कोंढासावली, परसोली आणि बिटोली या १२ दुर्गम गावांतील विद्यार्थ्यांना या सेवेचा लाभ मिळत आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांना दाट जंगलातून पायी शाळेत जावे लागत होते. या परिसरात वाघ व बिबट्यांचा वावर असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण होते.

ही समस्या लक्षात घेऊन ॲड. आशिष जयस्वाल यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधत विशेष बससेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. ३२ आसनी बस दोन सत्रांत चालविण्यात येत असून, विद्यार्थ्यांना नवेगाव खैरी येथील शाळेत सुरक्षितपणे पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढण्यास, शाळागळती रोखण्यास आणि मानव-वन्यजीव संघर्षाचा धोका कमी करण्यास मदत होत आहे. तसेच पालकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक रमेश कुमार, उपसंचालक अक्षय गजभिये, सहायक वनसंरक्षक प्रकाश अवधूतवार आणि नागलवाडी वनक्षेत्र अधिकारी अभिजीत इलमकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शिक्षण, विद्यार्थी सुरक्षा आणि वन्यजीव संवर्धन यांचा सुंदर समन्वय साधणारा हा उपक्रम दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Popular Articles