– ग्रामीण समस्या, शेतकरी प्रश्न आणि युवकांच्या रोजगाराबाबत परखड भाष्य; हक्कांसाठी एकजुटीचे आवाहन
हंसराज,भंडारा टेकेपार-डोडमाझरी :- येथील ग्राम टेकेपार-डोडमाझरी येथे दिनांक २४ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित मंडई उत्सवाचे उद्घाटन नंदगोपाल फाउंडेशन, भंडाराचे संस्थापक तथा समाजसेवक डॉ. यशवंत गोपाळराव लांजेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडले. यावेळी डॉ. लांजेवार यांनी आपल्या समाजप्रबोधनपर आणि अभ्यासपूर्ण भाषणाने उपस्थित ग्रामस्थांना मंत्रमुग्ध केले.
आपल्या प्रभावी भाषणात डॉ. लांजेवार यांनी भंडारा जिल्ह्यातील सद्यस्थिती, ग्रामीण भागातील विविध समस्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर परखड भाष्य केले. यावेळी ते म्हणाले की, “जिल्ह्यातील सुशिक्षित युवकांना रोजगारासाठी बाहेरगावी स्थलांतर करावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही, तर जंगली प्राण्यांच्या हल्ल्यांत निष्पाप नागरिकांचे जीव जात आहेत. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींची दुरवस्था झाली आहे; मात्र या गंभीर प्रश्नांकडे लक्ष देणार कोण?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी व्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले.
पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, केवळ समस्या मांडून चालणार नाही, तर आपल्या हक्कांसाठी नागरिकांनी एकजुटीने पुढे येऊन संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे. गावाचा विकास, युवकांचे भविष्य, शेतकऱ्यांचे न्याय्य हक्क आणि ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांसाठी प्रत्येक नागरिकाने जागरूक होणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
डॉ. लांजेवार यांची जिल्ह्याविषयी असलेली तळमळ आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी पाहून उपस्थित ग्रामस्थ भारावून गेले. संपूर्ण भाषणादरम्यान ग्रामस्थांनी एकाग्रतेने आणि उत्स्फूर्तपणे त्यांचे विचार ऐकले. त्यांच्या भाषणाने उपस्थित युवकांमध्येही नवचैतन्याचा संचार झाला. याप्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने डॉ. यशवंत लांजेवार यांचा सत्कार करून त्यांच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक व गौरव करण्यात आला.
राजकारणापलीकडे जाऊन समाजातील प्रश्नांची जाणीव ठेवणारे आणि सामान्य माणसाच्या हक्कांसाठी आवाज उठवणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी उपस्थितांच्या मनावर वेगळी छाप सोडली. “गावाचा विकास हा केवळ नेतृत्वाने नाही, तर जागरूक आणि एकजूट नागरिकांनीही घडवायचा असतो,” हा मोलाचा संदेश या मंडई उत्सवाच्या निमित्ताने ग्रामस्थांना मिळाला.





