spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कन्हान नदीपात्रातून अवैध रेती तस्करीचा पर्दाफाश; ७५ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त!

– खापा पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई; जेसीबी चालकासह दोघांना अटक, हायवा व ट्रॅक्टर चालक फरार

खापा, वार्ताहर :- कन्हान नदीपात्रातून अवैधरित्या रेती उत्खनन करून तिची साठवणूक व तस्करी करणाऱ्यांविरुद्ध खापा पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई केली. वाकी बिट हद्दीतील बिडचिचघाट परिसरात केलेल्या या कारवाईत जेसीबी, हायवा ट्रक, ट्रॅक्टर, मोबाईल आणि रेतीसह एकूण ७५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी जेसीबी चालक आणि हेल्पर अशा दोघांना ताब्यात घेण्यात आले असून हायवा व ट्रॅक्टरचे चालक घटनास्थळावरून फरार झाले. अवैध रेती उत्खनन व तस्करीविरोधात खापा पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे परिसरातील रेती तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २५ नोव्हेंबर रोजी पहाटे १.४५ वाजताच्या सुमारास खापा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एकनाथ राठोड यांना गोपनीय माहिती मिळाली की, वाकी बिट हद्दीतील बिडचिचघाट येथे कन्हान नदीपात्रातून अवैधरित्या रेतीची तस्करी सुरू आहे. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक एकनाथ राठोड यांनी पोलीस अंमलदार निलेश गावंडे व शासकीय वाहनचालक यांच्या मदतीने कारवाईची तयारी केली. दरम्यान, अतिरिक्त मदतीसाठी पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे यांच्याकडे पोलीस पथक पाठविण्याची विनंती करण्यात आली.

याचदरम्यान रात्रगस्तीवर असलेले पोलीस हवालदार श्याम सोळंकी हे चालक पाचपिल्ले यांच्यासह शासकीय वाहनाने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी व दोन पंचांच्या मदतीने संशयित ठिकाणी घेराव घातला. यावेळी जेसीबीच्या साहाय्याने साठवून ठेवलेली रेती टाटा हायवा ट्रकमध्ये भरली जात असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी घटनास्थळाला घेराव घातला असता हायवा ट्रक व ट्रॅक्टरचे चालक वाहन सोडून अंधाराचा फायदा घेत पसार झाले. तर जेसीबी चालक चोखेलाल बेनीश्याम पंचेश्वर (वय ४२, रा. शिवनगर, खापरखेडा) आणि हेल्पर प्रमोद पन्ना खैरवार (वय ३४, रा. शिवनगर, खापरखेडा) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता नदीकाठावर अंदाजे चार ब्रास रेती साठवून ठेवलेली, तर हायवा ट्रकमध्ये अंदाजे चार ब्रास रेती भरलेली आढळली. सदर रेतीसाठी कोणतीही वैध रॉयल्टी, परवाना किंवा वाहतूक पास नसल्याचे चौकशीत समोर आले. जेसीबी चालकाच्या माहितीनुसार, हायवा मालक सुजीत ठाकूर यांच्या सांगण्यावरून नदीपात्रातून ट्रॅक्टरच्या साहाय्याने रेती आणून तिची साठवणूक केली जात होती आणि नंतर जेसीबीच्या मदतीने हायवामध्ये भरून वाहतूक केली जात होती.

या कारवाईत सुमारे २० लाख रुपये किमतीची जेसीबी, ५० लाख ४० हजार रुपये किमतीचा टाटा सिग्ना हायवा ट्रक, ५ लाख रुपये किमतीचा सोनालिका ट्रॅक्टर, दोन मोबाईल आणि रेती असा एकूण ७५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी जेसीबी चालक चोखेलाल पंचेश्वर, हेल्पर प्रमोद खैरवार, हायवा चालक संकेत कोल्हे (रा. खंडाळा पारडी), हायवा मालक सुजीत ठाकूर (रा. निंबा, ता. पारशिवनी) आणि ट्रॅक्टरच्या फरार चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेसह महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, खान आणि खनिज अधिनियम व पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळाचा पंचनामा पोलीस उपनिरीक्षक एकनाथ राठोड यांनी ई-साक्ष ॲपवर नोंदविला असून पुढील तपास खापा पोलीस करीत आहेत.

या कारवाईत पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे, पोलीस उपनिरीक्षक एकनाथ राठोड, पोलीस हवालदार श्याम सोळंकी, पोलीस अंमलदार निलेश गावंडे, चालक पाचपिल्ले तसेच रात्रगस्तीवरील पोलीस पथकाने सहभाग घेतला.

Popular Articles