– ASDD यादीतील पात्र मतदारांनी गणना प्रपत्र सादर करावे – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा
गडचिरोली :- भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ अंतर्गत ASDD प्रकारात नोंद झालेल्या पात्र मतदारांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शनिवार, २८ नोव्हेंबर आणि रविवार, २९ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधित पात्र मतदारांनी या शिबिरांचा लाभ घेऊन गणना प्रपत्र व आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार अशा चार प्रकारांत नोंद झालेल्या मतदारांपैकी पात्र मतदारांना गणना प्रपत्र सादर करण्याची संधी निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. प्राप्त गणना प्रपत्रांची विहित प्रक्रियेनुसार पडताळणी करून पात्र मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. विशेष शिबिरांमध्ये संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यामार्फत गणना प्रपत्र भरणे, आवश्यक निवेदन व कागदपत्रे सादर करणे तसेच मतदार नोंदणी प्रक्रियेबाबत मार्गदर्शन व सहाय्य करण्यात येणार आहे.
३० नोव्हेंबरपर्यंत गणना प्रपत्र संकलनाची मुदत
भारत निवडणूक आयोगाच्या निर्धारित कार्यक्रमानुसार गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत करण्यात येणार आहे. गणना प्रपत्रांबाबतची पुढील कार्यवाही १० डिसेंबरपर्यंत, तर दावे व हरकतींचा निपटारा १५ डिसेंबरपर्यंत करण्यात येणार आहे. अंतिम मतदार यादीचे प्रकाशन २२ डिसेंबर २०२६ रोजी नियोजित आहे. जिल्ह्यातील ASDD प्रकारात नोंद झालेल्या पात्र मतदारांनी आपल्या संबंधित मतदान केंद्रावरील विशेष शिबिरात उपस्थित राहून गणना प्रपत्रात अचूक माहिती नमूद करावी आणि आवश्यक कागदपत्रांसह ते सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले असल्याचे उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राहुल जाधव यांनी कळविले आहे.






