spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

एसटी प्रवाशांच्या डोक्यावर छत्र; निवाऱ्यांसाठी २१० कोटी मंजूर

मुंबई :- राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या बसची प्रतीक्षा करताना उन्हाचा तडाखा आणि पावसाचा मारा सहन करणाऱ्या ग्रामीण भागातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. राज्यभरातील ३१ विभागांत तब्बल २,७०० थांब्यांवर निवारा शेड उभारण्याचे नियोजन महामंडळाने केले आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात १४ विभागांतील १,०५० निवारा शेड उभारण्यासाठी विभागाकडून २१० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.

२,७०० ठिकाणी आधुनिक प्रवासी निवारे उभारण्याचे नियोजन

एसटीच्या ग्रामीण भागातील मार्गस्थ निवाऱ्यांची पडझड झाल्याने प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी निवारे उभारण्याचा निर्णय घेतला होता. अनेक गावांमध्ये एसटी बसथांबे असले तरी प्रवाशांना ऊन-पावसापासून संरक्षण मिळेल अशी व्यवस्था नाही. त्यामुळे प्रवाशांना बसची प्रतीक्षा करताना गैरसोयीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील २,७०० ठिकाणी आधुनिक प्रवासी निवारे उभारण्याचे नियोजन करण्यात आले. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल.

पहिल्या टप्प्यात १४ विभागांचा समावेश

राज्यातील १४ विभागांमध्ये प्रत्येकी ७५ प्रवासी निवारे उभारण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १,०५० निवारे उभारले जाणार आहेत. प्रत्येक निवाऱ्यासाठी २० लाख रुपये खर्च गृहीत असून एकूण २१० कोटी रुपयांची तरतूद होते. उर्वरित निवाऱ्यांसाठीही पुढील टप्प्यांत निधी मंजूर होणे अपेक्षित आहे.

अशी असेल निवारा शेड

प्रस्तावित निवारा शेडची लांबी ३० फूट आणि रुंदी आठ फूट असणार आहे. सुमारे २२.३ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या शेडमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय पाणीपुरवठा, सांडपाणी निचरा आणि विद्युत सुविधांसाठीही तरतूद करण्यात आली आहे. शेडच्या बांधकामासोबत आवश्यक संरचना आणि इतर सुविधांचाही समावेश असेल असे एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Popular Articles