हंसराज,भंडारा :- जिल्ह्यात गुन्हेगारी कारवाया करून दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात ‘नेहरू वार्ड मेंढा’ टोळीचा नायनाट करण्यासाठी भंडारा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. यामध्ये टोळीप्रमुख प्रभाकर उर्फ कम्मो शाम चंदनबटवे (वय २४, रा. नेहरू वार्ड मेंढा, भंडारा) याच्यासह टोळीतील सक्रिय सदस्य प्रणय उर्फ पन्नू सुनील बोरकर (वय १९, रा. नेहरू वार्ड मेंढा, भंडारा), विक्की प्रमोद मुटकुरे (वय १९, रा. नेहरू वार्ड मेंढा, भंडारा), प्रणय वामन नागोसे (वय २१, रा. शुक्रवारी, भंडारा) आणि विवेक विदेश कोडापे (वय २२, रा. नेहरू वार्ड मेंढा, भंडारा) यांच्यावर ‘मकोका’ कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून, विशेष पोलीस महानिरीक्षक (नागपूर परिक्षेत्र) संदिप पाटील यांनी दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
टोळीप्रमुख प्रभाकर चंदनबटवे याने सन २०२० पासून ही टोळी प्रस्थापित केली होती. टोळीचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी व आर्थिक फायद्यासाठी नवीन सदस्यांना सामील करून चोरी करणे, खुनाचा प्रयत्न करणे, दुखापत करणे यांसारखे गंभीर गुन्हे या टोळीकडून केले जात होते. यापूर्वी या आरोपींना अटक करून व प्रभावी प्रतिबंधक कारवाई करूनही त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीत कोणताच बदल झाला नाही. उलट कारागृहातून जामिनावर सुटताच ते पुन्हा नवे सदस्य जोडून जिल्ह्यात गुन्हे करत समाजात दहशत निर्माण करत होते.
याच पार्श्वभूमीवर दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १०.२० वाजताच्या सुमारास फिर्यादी हे आपल्या मित्रासोबत पानटपरीचे दुकान बंद करत असताना, आरोपी विक्की मुटकुरे, प्रणय बोरकर आणि प्रणय नागोसे यांनी संगनमत करून दुकानासमोर येत फिर्यादीला शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच हातातील तलवार, चाकू आणि लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यावर, खांद्यावर व शरीरावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. याप्रकरणी दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी भंडारा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०९(१), ११८(१), ३५२, ३५१(१), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी अटक आरोपी विक्की मुटकुरे आणि प्रणय बोरकर यांची विचारपूस केली असता, हा हल्ला टोळीप्रमुख प्रभाकर चंदनबटवे आणि सदस्य विवेक कोडापे यांच्या सांगण्यावरून कट रचून केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता कलम ६१(२) आणि ४९ ची वाढ करण्यात आली.
या टोळीची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्यांची गळचेपी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नूरूल हसन यांनी त्यांच्याविरुद्ध ‘मकोका’ कायद्यान्वये प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार भंडारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांनी प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी विशेष पोलीस महानिरीक्षक संदिप पाटील यांच्या कार्यालयात सादर केला होता. कायद्याच्या कसोटीत बसवून दि. २५ नोव्हेंबर रोजी या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने गुन्ह्यात मकोका कायद्याची कलमे वाढवण्यात येत आहेत. जिल्ह्यातील इतर टोळ्यांच्या गुन्हेगारांचाही अभिलेख तपासून मकोका कायद्यान्वये कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासन दक्ष आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नूरूल हसन व अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, भंडारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि भंडारा पोलीस ठाण्याच्या अंमलदारांनी केली.






