हंसराज,भंडारा लाखनी :- स्थानिक स्व. निर्धन पाटील वाघाये कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संविधान दिन आणि २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. गणेश कापसे हे होते.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना प्रा. कवी सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना संविधान दिनाची माहिती दिली. भारतीय संविधानामध्ये समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या
मूल्यांचा अंतर्भाव करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्राणांचे बलिदान देऊन नागरिकांचे प्राण वाचवणाऱ्या पोलीस दलातील शूरवीरांच्या महान कार्याला त्यांनी सलाम केला. त्यानंतर प्रा. मनीषा सपाटे यांनी संविधानाचे अनन्यसाधारण महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्याचा उपभोग घेताना इतरांना त्रास किंवा इजा होणार नाही याची काळजी तरुण पिढीने घ्यावी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचा गैरवापर करून चुकीची कृत्ये करू नयेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रमुख वक्ते प्रा. करवाडे यांनी संविधानाने नागरिकांना दिलेले सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय अधिकार सविस्तरपणे मांडले. वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार तसेच महिलांना स्वातंत्र्य, शिक्षण आणि आर्थिक समानतेचा अधिकार संविधानामुळेच मिळाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. २६ जानेवारी १९५० रोजी संपूर्ण देशात संविधानाची अंमलबजावणी झाली असून संविधानासमोर कोणीही कनिष्ठ किंवा श्रेष्ठ नसून सर्वजण समान असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. गणेश कापसे यांनी भारतातील विविध भाषा, धर्म, पंथ, संस्कृती आणि चालीरीतींचा उल्लेख करत, इतकी सामाजिक विविधता असूनही आपला देश राज्यघटनेमुळेच एकसंघ राहिला असल्याचे प्रतिपादन केले. तसेच २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील
शूरवीरांना त्यांनी आदरांजली वाहिली.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. पुण्यशिल टेंभुर्णे यांनी केले, तर प्रा. मुनेश्वर हलमारे यांनी मान्यवरांचे आभार मानले. याप्रसंगी कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील प्रा. मंगेश कुकडे, प्रा. स्मिता तितरमारे, प्रा. रांगडाले, प्रा. कागदे यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






