हंसराज,भंडारा लाखांदूर :- महाराष्ट्र मिनरल कॉर्पोरेशनच्या कायनाईट माईन्समधील थकीत वेतन, भत्ते आणि ग्रॅच्युटीसाठी तब्बल २३ वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या ८० ते ८५ वयोगटातील सात वृद्ध कामगारांनी संविधान दिनी (दि. २६ नोव्हेंबर) लाखांदूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले. महाराष्ट्र महासंघाचे राज्याध्यक्ष प्रा. म. ना. कांबळे आणि महासचिव राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनात बारमाही रोजंदारी वन मजूर कामगार संघटनेचे नागपूर विभागीय अध्यक्ष युवराज रामटेके यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता तहसीलदारांनी दुपारी ४.३० वाजता शिष्टमंडळास चर्चेसाठी पाचारण केले. यामध्ये रिपब्लिकन सेना प्रभारी मनोज खोब्रागडे, काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे राज्य उपाध्यक्ष मनोज बागडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अचल मेश्राम, सुधीर खोब्रागडे,ईश्वर हनवते व रोशन कांबळे यांचा समावेश होता. दीड तासाच्या सखोल चर्चेनंतर तहसीलदारांनी लेखी आश्वासन दिले. यानुसार दहेगाव माईन्समधील जप्त साठ्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे मोजमाप व जिल्हा खनीकर्म अधिकाऱ्यांमार्फत मूल्यांकन करणे, सर्व कागदपत्रे उपलब्ध करून देणे आणि नागपूरच्या भूविज्ञान व खनीकर्म संचालनालयाकडे लिलावासाठी पाठपुरावा करण्याचे मान्य केले.
या लेखी आश्वासनानंतर तहसीलदारांनी उपोषणकर्त्यांना शीतपेय दिले, त्यानंतर हे उपोषण पुढील १५ दिवसांसाठी तूर्तास स्थगित करण्यात आले. या कालावधीत उचित कार्यवाही न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. पुढील पंधरा दिवसांत शासन-प्रशासन काय कार्यवाही करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






