नागपूर, ता. २६ : शहरातील सफाई कामगारांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत उप्पलवाडी परिसरात नागपूर महानगरपालिकेतर्फे घरकुल उपलब्ध करून दिले जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेचे भूमिपूजन हस्ते लवकरच होणार असल्याची माहिती राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग उपाख्य सतीश डागोर यांनी दिली.
शहरातील सफाई कामगारांच्या विविध समस्यांच्या संदर्भात आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्यासह मनपा मुख्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीला मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, उपायुक्त राजेश भगत, सहाय्यक आयुक्त श्याम कापसे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, यांच्यासह मोती जनवारे, जयसिंग कछवा, राजेश हाथीबेड, उमेश पिंपरे, किशोर समुंद्रे, विक्की बढेल, प्रदीप महतो, किशोर बिरला व राजेंद्र हजारे उपस्थित होते.
शहरातील सफाई कामगारांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी कामठी मार्गावरील उप्पलवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेंतर्गत घरकुल बांधण्यात येणार आहे. या घरकुल योजनेअंतर्गत शहरातील ४०० पेक्षा अधिक सफाई कामगारांना २ बीएचकेचे घरकुल उपलब्ध होणार आहे. ही योजना कार्यान्वित करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी पुढाकार घेतल्याचा आवर्जुन उल्लेख शेरसिंग डागोर यांनी केला. या योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लवकरच होणार असल्याचे डागोर यांनी सांगितले. तसेच स्वच्छ भारत मिशनच्या क्रमवारीत मनपाचे स्थान २७ व्या क्रमांकावरून २२ व्या क्रमांकावर आल्याबद्दल डागोर यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यापूर्वी मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी शेरसिंग डागोर यांचे मनपाचा मानाचा दुपट्टा व तुळशीचे रोपटे देऊन स्वागत केले.
सामायिक सेवा ज्येष्ठता यादी
नागपूर महानगरपालिकेत इतर कर्मचाऱ्यांसोबत सफाई कामगारांच्या उच्च शिक्षित कामगारांची सेवा ज्येष्ठता केली जाणार असल्याची माहिती यावेळी महानगरपालिकेतर्फे देण्यात आली. या संदर्भात राज्य सरकारने जारी केलेल्या शासन आदेशानुसार सामायिक सेवा ज्येष्ठता यादी तयार करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
कोरोना योद्ध स्मारक
कोराना काळात सफाई कामगारांसह नागपूर महानगरपालिकेच्या कर्मचार्यांचा सेवा करताना मृत्यू झालेल्या कर्मचार्यांच्या स्मरणार्थ शहरात कोरोना योद्धा शहीद स्मारक उभारण्यात यावे, अशी सूचना यावेळी शेरसिंग डागोर यांनी केली. त्याचप्रमाणे सफाई कामगारांना कैशलेस वैद्यकीय उपचारासाठी देण्यासाठी आरोग्य विमा उतरविण्याच्या संदर्भात महापालिकेने तत्वतः निर्णय घेतला असून या संदर्भात विमा कंपन्यांशी चर्चा सुरू आहे.




