spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

“मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे ठाम

आज सकाळी मुंबईकडे मोर्चाची कूच” 

जालना २७ : मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच पेटणार आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आंदोलकांचा मोर्चा आज मुंबईकडे रवाना होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जरांगेंना मुंबईत मोर्चा न काढण्याबाबत कडक इशारा दिला होता. मात्र, त्या आदेशाला न जुमानता मराठा बांधव आज सकाळीच मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत.

मंगळवारी उशिरा रात्री हजारो मराठा बांधव वाहनांसह अंतरवाली सराटीत दाखल झाले असून गावातील वातावरण पूर्णपणे आंदोलनमय झाले आहे. गावाच्या रस्त्यांवर मराठा समाजाच्या गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या असून घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दुमदुमत आहे.

जरांगे यांनी मराठा आणि कुणबी समाज एकच असल्याचे दस्तऐवजांसह पुरावे सादर केले आहेत आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी ठामपणे केली आहे. मुंबईतील आझाद मैदानात होणारे उपोषण आंदोलन निर्णायक ठरणार असून “विजय मिळवल्याशिवाय माघारी फिरणार नाही” असा निर्धार जरांगे यांनी व्यक्त केला आहे. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या मोर्चाला मुंबईत प्रवेश नाकारला आहे.

मंगळवारी रात्री उशिरा पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल खांबे यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. त्यांनी कोर्टाच्या निर्णयाची प्रत जरांगेंना सुपूर्द केली आणि मुंबईकडे न जाण्याची विनंती केली. तसेच आझाद मैदानावरील आंदोलनाला मनाई केल्याची माहिती दिली. मात्र, मनोज जरांगे यांनी आपला निर्णय बदलण्यास नकार दिला असून आज सकाळी ठरल्याप्रमाणे ते मराठा आंदोलकांसह मुंबईकडे कूच करणार आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.