मुंबई 30 – हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने राज्य सरकार ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे झुकल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यावर निर्माण होणाऱ्या मराठी ताकदीच्या भूकंपाच्या भीतीनेच सरकारने पायउतार व्हायचा निर्णय घेतला, असे प्रतिपादन उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले. हा केवळ विजयाचा प्रारंभ असून, यापुढेही अशा लढ्यांत सरकारला माघार घ्यावी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संजय राऊत म्हणाले, “जेव्हा राज ठाकरे यांनी एकत्र येण्याचे आवाहन केले, त्यानंतर अवघ्या १० मिनिटांत उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मराठीच्या प्रत्येक लढ्यात ठाकरे बंधू एकत्र असतील. मुंबईसह महाराष्ट्राची सत्ता मराठी माणसांच्या हाती यावी ही आमची इच्छा आहे.”
ते पुढे म्हणाले, “जर फडणवीस-प्रफुल पटेल, फडणवीस-शिंदे, फडणवीस-हसन मुश्रीफ एकत्र येऊ शकतात, तर दोन भाऊ एकत्र आल्यावर पोटदुखी का होते? एकाच विचाराचे नेते एकत्र आल्यावर तुम्ही वैफल्यग्रस्त होत आहात. कधीकाळी शिंदे फडणवीसांना भ्रष्टाचारी म्हणत होते, तर फडणवीस अजित पवारांना तुरुंगात टाकण्याची भाषा करत होते. त्यामुळे भूतकाळाची आठवण करून देऊ नका. येणाऱ्या काळात कोण पुढे जाते, हे स्पष्ट होईल.” राऊतांनी स्पष्ट केले की, हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेणे हा फडणवीसांचा शहाणपणाचा पहिलाच निर्णय आहे. ठाकरे बंधू एकत्र आले, मोर्चाची घोषणा झाली आणि त्यानंतर सरकारने निर्णय मागे घेतला. लाखो मराठी लोक मोर्चासाठी एकत्र येणार होते, हे लक्षात घेऊनच सरकारने धसका घेतला. त्रिभाषा सूत्र आम्ही मान्य करणार नाही. दोन ठाकरे बंधूंच्या स्पष्ट भूमिकेमुळे सरकारने ‘समितीचा खेळ’ बंद केला पाहिजे.
५ जुलैचा विजयी जल्लोष
५ जुलैला होणाऱ्या विजयी मेळाव्यावर संजय राऊत म्हणाले की, राज आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र येणे हे महाराष्ट्रासाठी मोठे आकर्षण आहे. त्यामुळेच सरकारने हिंदी सक्तीबाबतचा अध्यादेश मागे घेतला. मोर्चाची तयारी पूर्ण झाली होती. ही मराठी ताकद सरकारसमोर मांडायची होती. आता हा विजय मेळावा निश्चितच साजरा केला जाईल. राज ठाकरे आज आपली भूमिका स्पष्ट करतील. या दोन प्रमुख नेत्यांसोबत मोर्चात सहभागी होणारे सर्व घटक यामध्ये सामील होतील. ही लढाई कोणाला दूर ठेवून नव्हे, तर सगळ्यांना एकत्र घेऊनच लढायची आहे.
फडणवीसांचा खोटा दावा – राऊतांचा आरोप
त्रिभाषा सूत्राच्या अहवालासंदर्भात फडणवीस यांनी ‘तो अहवाल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना स्वीकारण्यात आला’ असा दावा केला होता. यावर पलटवार करताना संजय राऊत म्हणाले, “फडणवीस खोटं बोलत आहेत. जसं मोदी-शाह दिल्लीत खोटं बोलतात, तसंच फडणवीस राज्यात बोलतात. माशेलकर अहवाल टेबलावर ठेवा. हवेत बाण सोडू नका. नरेंद्र जाधव अभ्यासगट स्थापन केला का? मंत्रीमंडळ आणि मुख्यमंत्री निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घेतात. त्यामुळे समिती स्थापन केली जाते. हे सरकार मराठी माणसाच्या विश्वासाशी खेळ करत आहे.”




