चंद्रपूर २९ : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील कापणगाव येथे भरधाव ट्रकने रिक्षाला दिलेल्या जोरदार धडकेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना इतकी भीषण होती की अपघातस्थळी मृतदेहांचा चुराडा झाला. जखमींना तातडीने चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांमध्ये ऑटोचालक प्रकाश मेश्राम (४८, पाचगाव), रवींद्र बोबडे (४८, पाचगाव), शंकर पिपरे (५०, कोची) आणि वर्षा मांदाडे (५०, खामोनी) यांचा समावेश आहे. एका प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर राजुरा येथे उपचार सुरू आहेत. अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार ट्रक हा राजुराकडून खामोनी-पाचगावकडे जात होता, तर रिक्षा गडचांदूर येथून राजुराच्या दिशेने निघाली होती. कापणगाव येथे रिक्षा सर्विस रोड वरून हायवेवर चढताच विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने तिला जोरदार धडक दिली. यात रिक्षाचालकासह तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर तेथून जात असलेल्या राजुरा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे यांनी तत्काळ अपघातग्रस्तांना मदत केली व रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




