– मस्तानसह सहा जणांवर मकोका
वर्धा :- कुख्यात गुंड व टोळी प्रमुख पियुष ऊर्फ मस्तान राजू मुसळे (२७, रा. माता मंदिर वार्ड, हिंगणघाट) व त्याच्या पाच साथीदारांविरुद्ध पोलिसांनी मकोका अन्वये कारवाई केली. या सहाही आरोपींविरुद्ध नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल होते.
कुख्यात गुंड व टोळी प्रमुख पियुष ऊर्फ मस्तान राजू मुसळे आणि त्याचे सहकारी निखिल मनोज रामनवार (२५, रा. शास्त्री वार्ड, हिंगणघाट), जय वसंत चुटे (२१, रा. संत ज्ञानेश्वर वार्ड, हिंगणघाट), कार्तिक वसंत हमद (१९, रा. संत तुकडोजी वार्ड, हिंगणघाट), पंकज प्रभाकर साठवणे (रा. नागपूर), रितीक ऊर्फ पकोडा प्रकाश खोडे (२६, रा. माता मंदिर वार्ड, हिंगणघाट) यांच्याविरुद्ध नागपूर जिल्ह्यातील हिंगणघाट, सक्करदरा, अजनी, हुडकेश्वर, इमामवाडा, नंदनवन, पारडी, बोरी, तर चंद्रपूर जिल्ह्यातील सावली, पोलिस ठाण्यात दुखापत, साथीदारांसह जबरी चोरी, दारूची वाहतूक, गैरकायद्याची मंडळी जमवून शस्त्रासह दुखापत, हद्दपार असताना प्राणघातक शस्त्रांसह प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश, अमली पदार्थ विक्री, धार्मिक भावना दुखावणे, अडवणूक करून शिवीगाळ, महिलांचा पाठलाग, घरफोडी, चोरी, जुगार अड्डा आदी प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
अपर पोलिस महासंचालकांनी दिली परवानगी
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ चे कलम ३(१) (दोन), ३(२), ३(४) समाविष्ट करून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ चे कलम २३ (१) अन्वये नागपूर येथील विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या आदेशाने उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात हिंगणघाटचे ठाणेदार अनिल राऊत व पथकाने तपास पूर्ण केला. नंतर आरोपींविरुद्ध पुरावे मिळून दोषारोपपत्र दाखल करण्याचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्फत अपर पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) यांना सादर केला होता. त्याची दखल घेत अपर पोलिस महासंचालकांनी टोळी प्रमुख व त्याच्या पाच सहकाऱ्यांविरुद्ध विशेष न्यायालयात (मकोका) दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगी दिली.
या पोलिसांची कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर अधीक्षक सदाशिव वाघमारे, एसडीपीओ सुशीलकुमार नायक, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अनिल राऊत, हवालदार अमोल आत्राम, महेश गिरी, उमेश लडके, रवी घाटुरले, भारत बुटलेकर, सतीश घवघवे, अश्विन सुखदेवे, अनंता हराळ, चेतन पिसे, दीपक मस्के यांनी केली.






